Join us  

मुंबईत दिसले चातक पक्षी; पाऊस येतोय...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 6:30 PM

ऊन्हाळा संपत आला असून, १ जून रोजी मान्सूनही केरळात दाखल होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुंबई : सर्वसाधारणरित्या चातक पक्षी निदर्शनास आल्यानंतर पावसाची चाहूल लागते, असे म्हटले जाते. आता ऊन्हाळा संपत आला असून, १ जून रोजी मान्सूनही केरळात दाखल होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर ८ जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. मान्सूनचे अंदाज वर्तविण्यात येत असतानाच १ जूनपासून राज्यात मान्सूनपूर्व सरी कोसळतील, अशी शक्यता आहे. त्यात आता मुंबई आणि ठाणे परिसरातदेखील चातक पक्षी निदर्शनास आल्याने पावसाची आशा आणखी वाढली आहे. तूर्तास मान्सून वेशीवरही दाखल झाला नसल्याने मुंबईकरांना तापदायक ऊकाड्याला सामोरे जावे लागत असून, अंगावरून घामाच्या धारा वाहत आहेत.प्लँट अँड निमल वेल्फेयर सोसायटी - मुंबई (पॉज-मुंबई) आणि अम्मा केअर फाउंडेशन (एसीएफ) चे स्वयंसेवक निशा कुंजू, हसमुख वळंजू आणि हितेश यादव यांनी मुंबई महालक्ष्मी, पेडर रोड, भांडुप आणि ठाणे लोक लोकमान्य नगर नंबर ४ येथे आढळून आलेल्या चार चातक पक्ष्यांवर उपचार केले. उष्माघातामुळे या पक्ष्यांना त्रास झाला होता. परिणामी मानवी वस्तीमध्ये स्वयंसेवकांना आढळले होते. या चारही पक्ष्यांची पशु चिकित्सक डॉ. राहुल मेश्राम यांच्या मदतीने तपासणी करण्यात आली. त्यांना काही वेळ देखरेखीखाली ठेवण्यात आले. ते पक्षी सुदृढ झाल्यानंतर त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले, असे पॉजचे संस्थापक सुनीष सुब्रमण्यन यांनी सांगितले. पक्षीतज्ज्ञांच्या मते चातक पक्षी साऊथ आफ्रिका येथून १५ ते ३० मे च्या दरम्यान प्रवास करत भारतात स्थलांतर होतात. हे पक्षी स्वत: आपली घरटी तयार करत नाहीत. हे पक्षी इतरांच्या घरटयामध्ये अंडी देतात. दरम्यान, हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा राज्यात पाऊस सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त असेल.  १ ते २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात कोसळण्याची शक्यता आहे. अल निनोचा प्रभाव पडणार नाही. मराठवाड्यात सर्वसामान्य तर विदर्भ येथे सामान्यापेक्षा कमी पाऊस होईल. सर्वसाधारणरित्या महाराष्ट्रात ८ जून रोजी पाऊस येईल. नेहमीपेक्षा जास्त रेंगाळून ८ आॅक्टोबर रोजी त्याच्या परतीचा प्रवास सुरु होईल. गेल्यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ३२ टक्के पेक्षा जास्त पाऊस झाला होता.

टॅग्स :मानसून स्पेशलमुंबईमहाराष्ट्र