Join us  

वरिष्ठ निरीक्षकाविरुद्ध गुन्हा, पोलिसांवर खंडणी अन् लाचखोरीचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 3:13 AM

एसीबीकडून कारवाई; दोन लाखांची लाच मागितल्याचे उघड

मुंबई : दक्षिण मुंबईतील एका प्रमुख पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने दोन लाखांच्या लाचेची मागणी केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. शिरीष मुरलीधर गायकवाड असे त्यांचे नाव असून ते जे.जे. मार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

प्रभारी अधिकाऱ्याच्या लाचखोरीचा प्रकार उघडकीस आल्याने मुंबई पोलीस वर्तुळात गुरुवारी खळबळ उडाली आहे. दरम्यान, गायकवाड हे अटकपूर्र्व जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. जे.जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहात असलेल्या एका तरुणावर पूर्वी काही गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर घातक कृत्याला लगाम घालण्यासाठी (एम.पी.डी.ए.) प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची भीती पोलिसांकडून दाखविण्यात येत होती. कारवाई टाळायची असल्यास त्याने दोन लाख रुपये द्यावेत, अशी मागणी वरिष्ठ निरीक्षक गायकवाड यांनी त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत पोलीस ठाण्यात बोलावून केली होती. तरुणाला ही रक्कम द्यायची नसल्याने त्याने त्याबाबत एससीबीकडे तक्रार दिली. त्यांनी रचलेल्या सापळ्यानुसार फिर्यादी तरुण हा पुन्हा पोलीस ठाण्यात जाऊन त्यासंबंधी गायकवाड यांच्याशी चर्चा करीत असताना त्याबाबतचे संभाषण मोबाइलमध्ये रेकॉर्ड करण्यात आले. त्यानंतर पथकाने गायकवाड यांच्याकडे चौकशी केली असता त्याने पैशांची मागणी केल्याची कबुली दिली. त्यानुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गायकवाड यांच्या कक्षातील कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असून लवकरच अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.पोलिसांवर खंडणी, लाचखोरीचे गुन्हेमुंबई पोलिसांसाठी गुरुवारचा दिवस लाजिरवाणा ठरला. सात वर्षांच्या मुलाला घरगुती वादातून अपहरण करून दीड कोटींची मागणी केल्याने चेंबूर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अमोल चव्हाणला औरंगाबाद पोलिसांनी सकाळी अटक केली. तर शिरीष गायकवाड यांनीही लाच मागितल्याचे उघड झाले. पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी भ्रष्टाचार, गैरशिस्त खपवून न घेण्याचा इशारा देऊनही असे प्रकार सुरूच आहेत.

टॅग्स :पोलिसमुंबई