प्रभारी कुलगुरूंचा कामाचा धडाका
By Admin | Updated: February 21, 2015 03:28 IST2015-02-21T03:28:37+5:302015-02-21T03:28:37+5:30
डॉ. राजन वेळुकर यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांचा पदभार सोपविण्यात आलेल्या प्रभारी कुलगुरुंनी शुक्रवारी विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कामाचा धडाका सुरु केला.

प्रभारी कुलगुरूंचा कामाचा धडाका
मुंबई : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेळुकर यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांचा पदभार सोपविण्यात आलेल्या प्रभारी कुलगुरुंनी शुक्रवारी विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कामाचा धडाका सुरु केला. परीक्षा पद्धत सुधारणे, विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचा बॅकलॉग भरुन काढणे, नवीन उपक्रमासाठी प्रत्येक विभागात सुचना पेटी लावणे असे निर्णय प्रभारी कुलगुरुंनी पहिल्या दिवशी घेतले.
वेळुकर यांना पदापासून दूर राहण्याचे आदेश दिल्यानंतर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु नरेशचंद्र यांच्याकडे प्रभारी कुलगुरु म्हणून पदभार सोपविण्यात आला आहे. कुलगुरु पदाची सुत्रे गुरुवारी रात्री स्विकारल्यानंतर नवीन प्रभारी कुलगुरुंनी शुक्रवारी पहिला दिवस अधिकाऱ्यांच्या बैठकांसाठी दिला. सकाळी अकरा वाजता कलिना कॅम्पसमधील विविध विभागाचे विभाग प्रमुख आणि अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी परीक्षा पद्धत सुरळीत करुन विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत, यासाठी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. तसेच कर्मचाऱ्यांना विद्यापीठातील तक्रार नोंदविण्यासाठी आणि सुचना सुचविण्यासाठी सुचना पेटी लावण्याचा निर्णय घेतला.
यानंतर त्यांनी सायंकाळी फोर्ट कॅम्पसमधील अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यामध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्याकडे येणाऱ्या फाईल्स तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले. कुलगुरुंना हटविल्याने विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांना आनंद झाला असून त्यांनी प्रभारी कुलगुरुंना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ठरविले आहे. (प्रतिनिधी)
राज्यपालांनी पदावरून दूर केलेले मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत किती महाविद्यालयांना भेट दिली, याची कोणतीही माहिती विद्यापीठ प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती विद्यापीठाने दिली आहे. यामुळे विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांनी नियुक्तीपासून किती महाविद्यालयांना भेटी दिल्या, तसेच कोणत्या महाविद्यालयांनी निमंत्रण देऊन कुलगुरूंना कार्यक्रमांना बोलावले, याची माहिती मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य वैभव नरवडे यांनी माहिती अधिकारात मागितली होती. नरवडे यांनी १९ डिसेंबर २०१४ रोजी विद्यापीठाकडे याबाबत माहिती मागवली होती. विद्यापीठाने नरवडे यांना १६ फेब्रुवारी २०१५ रोजी दिलेल्या उत्तरात विद्यापीठाकडे याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे.