२८ जानेवारीला फेरीवाला बंद!
By Admin | Updated: January 7, 2015 01:16 IST2015-01-07T01:16:53+5:302015-01-07T01:16:53+5:30
राज्य शासनामार्फत फेरीवाल्यांना नष्ट करण्यासाठी काही जाचक नियमांची आखणी केली जात असल्याचा आरोप करत मुंबई हॉकर्स युनियनने २८ जानेवारीला मुंबई बंदची हाक दिली आहे.

२८ जानेवारीला फेरीवाला बंद!
मुंबई : राज्य शासनामार्फत फेरीवाल्यांना नष्ट करण्यासाठी काही जाचक नियमांची आखणी केली जात असल्याचा आरोप करत मुंबई हॉकर्स युनियनने २८ जानेवारीला मुंबई बंदची हाक दिली आहे. या वेळी मुंबई शहरासह उपनगरातील सर्व पुरुष व स्त्री फेरीवाले फेरीचा धंदा बंद ठेवून आझाद मैदानावर धडक मोर्चा घेऊन धडकतील.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्र सरकारच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची मुंबई महानगरपालिका अंमलबजावणी करत नसल्याचा आरोप संघटनेने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. पोलिसांच्या मदतीने पालिका अधिकारी वारंवार फेरीवाल्यांवर कारवाई करत आहेत. आता तर फेरीवाल्यांना शहरातून बाहेर काढण्यासाठी पालिका राज्य शासनामार्फत जाचक नियम लादू पाहत आहे, असा संघटनेचा आरोप आहे. शहर नियोजन समितीमार्फत या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी काही प्रस्तावित नियमांची आखणी केली जात असल्याचे संघटनेने सांगितले. प्रस्तावित नियम इतके जाचक आहेत, की त्यामुळे कोणताही फेरीवाला मुंबईत धंदाच करू शकणार नाही, असा दावा संघटनेने केला आहे. परिणामी प्रस्तावित नियम रद्द करण्याची मागणी करत संघटनेने धडक मोर्चाची हाक दिली आहे. आझाद मैदानावर मोर्चा काढताना एक दिवस फेरीचा धंदा बंद ठेवण्याचे आवाहनही केले आहे. (प्रतिनिधी)
आज कार्यकर्ता मेळावा
२८ जानेवारीला काढण्यात येणाऱ्या मोर्चाची तयारी करण्यासाठी युनियनने बुधवारी, ७ जानेवारी रोजी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. ना.म. जोशी मार्ग येथील बाळ दंडवते स्मृती येथे कै. गोपाळ शेट्टीगार सभागृहात सकाळी ११ वाजल्यापासून संपूर्ण दिवसभर हा मेळावा पार पडेल.