Join us

विद्यापीठ परीक्षांचा गोंधळ संपेना; १८ ऑक्टोबरपर्यंत परीक्षा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 06:54 IST

जुनेच वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये

मुंबई : सायबर हल्ल्यामुळे आयडॉलच्या सर्व परीक्षा १८ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असून, १९ ऑक्टोबरपासून त्या पुन्हा सुरू होतील, अशी माहिती विद्यापीठाने विद्यार्थ्यांना जारी केली. मात्र, शुक्रवारी एम.कॉमच्या विद्यार्थ्यांना ९ ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू होत असल्याचे जुनेच वेळापत्रक विद्यापीठाने पाठवले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.एकीकडे विद्यापीठाकडून सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येते, तर दुसरीकडे खासगी पुरवठादार कंपनीकडून पुढच्या परीक्षेचे वेळापत्रक येते, याचा अर्थ विद्यार्थ्यांनी नेमका काय घ्यायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. विद्यापीठ आणि ऑनलाइन परीक्षेचे कंत्राट असणारी कंपनी यांच्यात असमन्वय असल्याचा नाराजीचा सूर विद्यार्थ्यांमध्ये आहे.९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एम.कॉमच्या परीक्षा या पूर्वघोषित वेळापत्रकानुसारच होत असल्याची माहिती विद्यापीठाने दिली. त्यानुसार, बिझिनेस मॅनेजमेंट पेपर ३ हा ९ आॅक्टोबरला दुपारी ३ वाजता असल्याचा मेसेज विद्यार्थ्यांना पाठविण्यात आला, तर उर्वरित पेपरचेही जुने वेळापत्रक देण्यात आले. परीक्षा रद्द झाली असल्याचे जाहीर केले असताना, विद्यापीठाकडून जुनेच वेळापत्रक विद्यार्थ्यांना पाठविले. विद्यापीठाच्या हेल्पलाइन क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला असता, प्रतिसाद न मिळाल्याने संभ्रम वाढला. याबाबत युवासेनेने आक्रमक भूमिका घेतली. विद्यापीठाने त्वरित सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी मुंबई विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत यांनी केली.नवीन वेळापत्रक लवकरचविद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधला असता, परीक्षा १८ आॅक्टोबरपर्यंत होणार नाहीत आणि नवीन वेळापत्रक विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर लवकर मिळेल. सीस्टिममध्ये आधीच रिमाइंडर सेट केलेले असल्याने विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक पोहोचले आहे. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करावे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.