Join us  

'शहराचं नाव बदलल्यानं सर्वसामान्यांना सुखाचे दोन घास मिळतात, का चांगल शिक्षण?'

By महेश गलांडे | Published: January 07, 2021 11:13 AM

विशेष म्हणजे, काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांच्या खात्याच्या निर्णयात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. काँग्रेसचा औरंगाबादच्या नामांतरणाला स्पष्ट विरोध असल्याचे जाहीर केले आहे.

ठळक मुद्दे'सर्वसामान्य माणसांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आपल्याला काम करायचंय. ज्यांनी ज्यांनी ज्या राज्यात शहरांची नावं बदलली, तिथं काय झालं? तेथील सामान्य माणसांचं जीवन बदललं का?, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकार परिषदेत विचारला.

मुंबई : औरंगाबादच्या नामांतरणावरुन राज्यातील राजकारण तापलेलं असताना मंत्रीमंडळ निर्णयाच्या माहितीमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्यानं महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादच्या उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. मुंबईत बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयाची माहिती मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर देण्यात आली आहे. मात्र, सरकारी खात्याकडून औरंगाबादचा संभाजीनगर उल्लेख झाल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, 

विशेष म्हणजे, काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांच्या खात्याच्या निर्णयात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. काँग्रेसचा औरंगाबादच्या नामांतरणाला स्पष्ट विरोध असल्याचे जाहीर केले आहे. मात्र याचदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असं केल्याने मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ३ ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर, थोरात यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन नाव बदलून काय उपयोग? शहराची नावं बदलल्यानं सर्वसामान्य माणसांच्या जीवनात काही बदल होतो का? असा थेट सवाल विचारला आहे. 

'सर्वसामान्य माणसांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आपल्याला काम करायचंय. ज्यांनी ज्यांनी ज्या राज्यात शहरांची नावं बदलली, तिथं काय झालं? तेथील सामान्य माणसांचं जीवन बदललं का?, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकार परिषदेत विचारला. तसेच, नाव बदलल्यानं सामान्य माणसाला दोन घास चांगले मिळायले का, चांगलं शिक्षण मिळायलं का, त्याचं राहणीमान बदललं का?, मग कशासाठी करायचं, असेही थोरात यांनी म्हटलं. तसेच, शहरांच्या नामांतरणाला आमचा विरोधच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.  

बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते आहे. भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया, असं आवाहनदेखील बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. 

टॅग्स :शिवसेनाकाँग्रेसऔरंगाबादबाळासाहेब थोरात