उद्यानांचा कायापालट!
By Admin | Updated: February 21, 2015 23:27 IST2015-02-21T23:27:52+5:302015-02-21T23:27:52+5:30
ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या उद्यानांचा आता येत्या दोन वर्षांत कायापालट होणार आहे.

उद्यानांचा कायापालट!
अजित मांडके - ठाणे
ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या उद्यानांचा आता येत्या दोन वर्षांत कायापालट होणार आहे. त्यांची दुरुस्ती व कायापालट करण्यासाठी पालिकेने ८ सल्लागार नेमले असून पुढील पाच वर्षे ते दुरुस्तीबरोबर देखभाल कशी करावी, यावर काम करणार आहेत. तसेच यंदा पहिल्या टप्प्यात १० उद्यानांचे नूतनीकरण केले जाणार असून १० नवीन पार्क विकसित केले जाणार आहेत. यंदाच्या अंदाजपत्रकात यासाठी १२.१३ कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे.
लोकमतमध्ये काही महिन्यांपूर्वी मालिकेच्या माध्यमातून शहरातील उद्यानांच्या दुरवस्थेसंदर्भातील पदार्फाश करण्यात आला होता. त्यानंतर, तत्कालीन महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी शहरातील गार्डनचा अहवाल मागवून त्यावर कशा पद्धतीने दुरुस्तीची कामे हाती घेता येऊ शकतात, याची माहितीदेखील मागितली होती. त्यानुसार, आता उद्यान विभागाने उद्यानांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी ८ सल्लागार नेमले आहेत. हे सल्लागार उद्यानाची सद्य:स्थिती, त्या ठिकाणी कशा पद्धतीने काम करता येऊ शकते, किती खर्च येऊ शकतो, कमी जागेतही चांगली दर्जेदार सुविधा देता येऊ शकते का, याचा अभ्यास करून त्याची निगा कशी राखावी, याचाही अभ्यास करणार आहेत.
पहिल्या टप्प्यात १० उद्यानांचा विकास करण्याचा विडा पालिकेने उचलला आहे. यामध्ये कासारवडवली, सावरकरनगर, बाराबंगला, कोपरी, खारेगाव, सावरकरनगर, कोलशेत, जवाहरबाग आदी मोठ्या उद्यानांचा यात समावेश आहे. या ठिकाणी सुरक्षा वॉल, तुटलेल्या जाळ्या बसविणे, नवी खेळणी बसविणे, सुरक्षा केबिन, पाण्याची व्यवस्था आदींसह इतर महत्त्वाची कामे केली जाणार आहेत.
याशिवाय, शहर विकास विभागाकडे आरक्षित असलेल्या पार्क म्हणून आरक्षित असलेल्या भूखंडांचाही विकास केला जाणार आहे. या ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे, कम्पाउंड वॉल बांधणे तसेच हे पार्क बीओटी अथवा इतर कोणत्या माध्यमातून विकसित करता येऊ शकतात, याचा अभ्यास केला जाणार आहे. पाचवर्षीय या कामासाठी १० कोटी तरतूद केली आहे. तसेच आता २०१५-१६ च्या अंदाजपत्रकातही उद्यानांच्या विकासासाठी १२.१३ कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे.
उद्यानांची दुरुस्ती झाल्यानंतर त्या ठिकाणी किंबहुना जे उद्यान मोठे असतील त्या ठिकाणी सुरक्षारक्षक असावेत, अशी मागणी उद्यान विभागाने केली असून हे सुरक्षारक्षक मिळावेत म्हणून त्यांनी सुरक्षा विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे.