Join us

बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 06:00 IST

मुंबई महापालिकेचा किनारी रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोड जवळपास पूर्ण झाला असून, तो वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्याने खुला करण्यात येत आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला कोस्टल रोड (दक्षिण) प्रकल्पाचा खर्च अंतिम टप्प्यापर्यंत तब्बल १४,७७९ कोटी रुपयांवर पोहोचला. सुरुवातीला यासाठी १२,७२१ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती. बांधकामातील बदल, अतिरिक्त कामे आणि करांच्या भारामुळे खर्चात सुमारे २,०५८ कोटींनी वाढला असल्याचे निदर्शनास आले. 

मुंबई महापालिकेचा किनारी रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोड जवळपास पूर्ण झाला असून, तो वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्याने खुला करण्यात येत आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूपर्यंतचा हा मार्ग मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेस मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. सुरुवातीला या प्रकल्पासाठी १२,७२१ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, बांधकामातील बदल, अतिरिक्त कामे आणि करांचा भार यामुळे खर्च सुमारे २,०५८ कोटींनी वाढला.

एका खांबामुळे कोट्यवधींची उड्डाणे

वरळीत दोन खांबांमधील अंतर १२० एवढे करून जलवाहतुकीसाठी मार्ग खुला करण्यासाठी एकल खांबाच्या आधारे बांधकाम करण्यात आले. यामुळे ९२२.९२ कोटींनी खर्च वाढला. त्यामुळे एकूण खर्च १३,९८३.८३ कोटींवर पोहोचला. त्यानंतर  समुद्रकिनारी नवीन टेट्रापॉडच्या कामामुळे या प्रकल्प खर्चात ४६.२७ कोटींनी वाढ होत एकूण प्रकल्प खर्च १४,०३०.१० कोटींवर पोहोचला.

खर्च वाढता वाढे...

वस्तू व सेवा करामुळे ३३९.३२ कोटींची वाढ.

वरळी समुद्रातील पुलाच्या दोन खांबांमधील अंतर वाढवून एकल खांब बांधणी ९२२.९२ कोटींचा वाढीव खर्च.

समुद्रकिनारी टेट्रापॉड - ४६.२७ कोटी

अमरसन्सऐवजी हाजीअली येथे वाहनतळ उभारणी - ७४९.२९ कोटींचा वाढीव खर्च.

प्रकल्पाचे भाग आणि खर्च

प्रियदर्शनी पार्क - बडोदा पॅलेस

कंत्राटदार : लार्सन अँड टुब्रो

मूळ खर्च : ५,२९०.५४ कोटी

सुधारित खर्च : ६,१८८.२५ कोटी

बडोदा पॅलेस - वांद्रे वरळी सागरी सेतू 

कंत्राटदार : एचसीसी-एचसीसी संयुक्त भागीदार  वाढीव खर्च ४,२२९.९० कोटी

प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल-

प्रियदर्शनी पार्क

कंत्राटदार - लार्सन ॲण्ड टुब्रो कंपनी मूळ खर्च - ४,२२०.०४ कोटी वाढीव खर्च - ४,३६१.२५ कोटी

टॅग्स :मुंबई