कृषी पुरस्कारांच्या पात्रता निकषांत बदल
By Admin | Updated: September 17, 2014 23:48 IST2014-09-17T23:22:38+5:302014-09-17T23:48:49+5:30
राज्य शासनाचा निर्णय : निवड समित्यांची पुनर्रचना

कृषी पुरस्कारांच्या पात्रता निकषांत बदल
कोपार्डे : कृषिक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था तसेच शेतकऱ्यांना दरवर्षी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते. राज्य सरकारद्वारे देण्यात येणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी या पुरस्कारांसाठीच्या निवड समित्यांची पुनर्रचना आणि पात्रतेच्या निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापुढे या निकषांनुसारच पुरस्कार देण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय समितीमध्ये प्रकल्प संचालक ग्रामविकास यंत्रणा यांच्याऐवजी प्रकल्प संचालक (आत्मा) यांचा समावेश करण्यात आला आहे. विभागस्तरीय समितीमध्ये विभागीय पणन अधिकारी यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. मुख्यालयाचे जिल्ह्याचे कृषी विकास अधिकारी (जिल्हा परिषद) यांच्याऐवजी संबंधित कृषी विद्यापीठाचे संचालक (विस्तार) यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. आयुक्तालय स्तर समितीत कृषी संचालक (आत्मा), कृषी संचालक (गुण नियंत्रक), व्यवस्थापकीय संचालक, राज्य कृषी पणन मंडळ संचालक, कृषी व संशोधन परिषद आयुक्त-पशुसंवर्धन यांचा सदस्य म्हणून नव्याने समावेश करण्यात आला आहे.
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार तालुकास्तर समितीत मंडल कृषी अधिकारी, पशुधन अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना वगळण्यात आले. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जिल्हास्तर समितीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), संबंधित सरव्यवस्थापक पणन मंडळ यांचा सदस्य म्हणून नव्याने समावेश करण्यात आला. प्रमुख कृषी अधिकारी यांना वगळण्यात आले आहे.
पुरस्काराचे निकष
डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र या पुरस्कारांसाठी प्रस्तावित करण्यात येणाऱ्या संस्था किंवा गट कृषिक्षेत्रात संघटनात्मक कार्य करणारे असल्यास त्यांचे काम संपूर्ण राज्याला दिशादर्शक असावे.
राज्य सरकारी, निमसरकारी, सरकारी अंगीकृत तसेच सहकारी संस्थांचे (उदा. स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी विद्यापीठे) आजी-माजी कर्मचारी अथवा केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारी संस्था पात्र असणार नाही.
कृषिभूषण पुरस्कारासाठी जिल्हास्तरीय समितीने प्रत्यक्ष कार्यक्षेत्राला भेट देऊन, कामाची खात्री करून निकषांनुसार शिफारशी आणि सविस्तर अभिप्रायांसह प्रस्ताव द्यावेत.
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांबाबतच कृषिभूषण पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करता येईल.
यांसह इतर नियम व निकषांचे पालन करणे आवश्यक आहे.