कामकाजाच्या वेळा बदला
By Admin | Updated: January 9, 2015 02:28 IST2015-01-09T02:28:04+5:302015-01-09T02:28:04+5:30
उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करण्याकरिता बृहन्मुंबईतील सरकारी व खासगी कंपन्यांमधील कार्यालयीन कामाची वेळ बदलण्याची सूचना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली
कामकाजाच्या वेळा बदला
रेल्वेमंत्री प्रभू यांची सूचना : प्रवाशांच्या तोंडाला पुसली पाने
मुंबई : उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करण्याकरिता बृहन्मुंबईतील सरकारी व खासगी कंपन्यांमधील कार्यालयीन कामाची वेळ बदलण्याची सूचना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली असून, त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या आणि अशा काही निर्णयांखेरीज प्रभू व फडणवीस यांच्या बैठकीतून उपनगरी रेल्वे प्रवाशांना लागलीच थेट दिलासा देणारा कुठलाही निर्णय झालेला नाही.
दिवा येथे रेल्वेचा पेंटोग्राफ तुटल्यानंतर मागील आठवड्यात झालेल्या जनक्षोभाच्या उद्रेकानंतर प्रभू यांनी आपण मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन प्रवाशांना दिलासा देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार उभयतांची बैठक झाली. त्यानंतर प्रभू म्हणाले की, सरकारी व खासगी कंपन्यांच्या कार्यालयीन कामकाजाची वेळ एकच असल्याने सकाळी व सायंकाळी विशिष्ट वेळी प्रवाशांची गर्दी होते. हे टाळण्याकरिता कार्यालयीन कामकाजाच्या वेळा बदलण्याची सूचना सरकारला केली. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली. (विशेष प्रतिनिधी)
नक्षलग्रस्त
भागात रेल्वे
गडचिरोली या नक्षलग्रस्त भागात रेल्वे सेवा पुरवण्याकरिता विशेष संस्थेची स्थापना केली जाईल. देशाच्या सीमेलगत रेल्वे सेवा पुरवताना संरक्षण दलाची मदत घेतली जाते. नक्षलग्रस्त भागातही अशी मदत घेतली जाईल, असे प्रभू यांनी स्पष्ट केले.
एलिव्हेटेड रेल्वेसह एलिव्हेटेड रोडही
च्राज्य सरकार व रेल्वे मंत्रालय यांच्यात विशिष्ट उद्दिष्टाकरिता एक कंपनी स्थापन करण्याची सूचना आपण केली असून, ही कंपनी प्रलंबित व नवीन प्रकल्पांच्या अंमलबजावणीकरिता प्रयत्न करील, असे प्रभू यांनी सांगितले.
च्एमयूटीपी - टप्पा ३ला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून, राज्य सरकारने अंमलबजावणी सुरू करावी, असे सांगितले आहे. याखेरीज छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल व चर्चगेट ते विरार या दोन मार्गांवर सध्याच्या रेल्वेमार्गावर सहा मार्गिकांचा एलिव्हेटेड रोड उभारण्यात येईल.
च्त्यावर एलिव्हेटेड रेल्वे असेल. अशी त्रिस्तरीय वाहतूक व्यवस्था असेल तर रेल्वे व रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होईल, असा दावा प्रभू यांनी केला. - सविस्तर वृत्त/२
दिवा रेल्वे गोंधळाबाबत अवाक्षर नाही
वरचेवर मेगाब्लॉक घेऊनही सातत्याने पेंटोग्राफ तुटणे, रेल्वे रुळाला तडा जाणे अथवा ओव्हरहेड वायर तुटणे आणि रेल्वे प्रवाशांचे हाल होणे यातून कशी सुटका होऊ शकेल याबाबत तसेच दिवा येथील रहिवाशांची दिवा लोकल सुरू करण्याची मागणी याबाबत प्रभू यांनी अवाक्षरही काढले नाही.