Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल करा, शिवसेना आमदार विलास पोतनीस यांची मागणी

By मनोहर कुंभेजकर | Updated: October 21, 2023 12:16 IST

तीन परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार असल्यामुळे  परीक्षार्थींना दोन परीक्षांना मुकावे लागणार आहे.

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दि 29 ऑक्टोबर 2023 रोजी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याच दिवशी नगरपरिषद भरती परीक्षा आणि महाज्योती मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग प्रशिक्षणार्थ्यांसाठीची परीक्षा देखील घेण्यात येणार आहे. या तिन्ही परीक्षा एकत्र होणार असल्याने स्पर्धा परीक्षांचे परीक्षार्थी संभ्रमात पडले आहेत. अशा प्रकारे तिन्ही परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार असल्यामुळे  परीक्षार्थींना दोन परीक्षांना मुकावे लागणार आहे.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक परिक्षार्थी रात्रंदिवस मेहनत करीत असतात. त्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विभागाकडून जाहीर करण्यात असलेल्या प्रत्येक स्पर्धा परीक्षांचा अर्ज एक संधी म्हणून लाखो परीक्षार्थी भरत असतात. 

परंतू या स्पर्धा परीक्षांच्या तारखा एकाच दिवशी आल्यास परीक्षार्थींना केवळ एकाच स्पर्धा परीक्षेला समोर जाता येते आणि कोणताही अपराध नसताना त्यांना अन्य स्पर्धां परिक्षांना मुकावे लागते.

त्यामुळे या परीक्षार्थीसमोर निर्माण झालेला अद्भुत परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून रविवार दि, 29 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी आणि नगरपरिषद परिषद भरतीच्या परीक्षेचे वेळापत्रक बदलण्यात यावे अशी विनंती शिवसेना उबाटा गटाचे आमदार विलास पोतनीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना पत्राद्वारे केली आहे. 

टॅग्स :एमपीएससी परीक्षाशिवसेनाविद्यार्थी