Join us
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरच्या लाकडापासून बनणार राम मंदिराचे दरवाजे! FRI शास्त्रज्ञांनी का लावली मोहोर जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 16:55 IST

देशभरात चर्चेत असलेले अयोध्येतील राम मंदिर आता पूर्णत्वास आले आहे. 

देशभरात चर्चेत असलेले अयोध्येतील राम मंदिर आता पूर्णत्वास आले आहे. अयोध्येत निर्माण होत असलेल्या राम मंदिराच्या दरवाजासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून सागवान लाकूड पाठवले जात आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या मंदिराचा महाद्वार, गर्भगृहाचा दरवाजा आणि उर्वरित दरवाजांसाठी लाकूड चंद्रपूरच्या जंगलातून पाठवण्यात येणार आहे. यासाठी २९ मार्च रोजी चंद्रपुरात भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

चंद्रपुरात २९ मार्च रोजी मंदिरासाठी लाकडे पाठवण्यासाठी भव्यदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. काष्ठपूजनानंतर रथातून मिरवणूक काढून अयोध्येकडे रवाना करण्यात येणार आहे. मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी डेहराडूनच्या फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटने चंद्रपूरचे सर्वोत्तम लाकूड असल्याचे सांगण्यात आले आहे त्यामुळे चंद्रपुरच्या लाकडाला राम मंदिरासाठी पसंती देण्यात आली आहे.

चंद्रपूरच्या वनविकास महामंडळाकडून महाराष्ट्रातील लाकडाचे नमुने पाठवण्यात आले होते. मंदिराच्या बांधकामाशी संबंधित लार्सन टुब्रो कंपनीने सर्वोत्तम लाकडाची शिफारस केली आहे. लाकडाची व्यवस्था केल्याबद्दल मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी मंत्री मुनगंटीवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

अयोध्या राममंदिराला गडचिरोलीचे सागवान, काष्टपूजेवरून राजकारण

२९ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमात गायक कैलाश खेर व्यतिरिक्त २१०० कलाकारांना ४३ प्रकारची लोकनृत्ये सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. योगगुरू रामदेव, सद्गुरु जग्गी वासुदेव, श्री श्री रविशंकर, अभिनेता अरुण गोविल यांच्यासह अनेक चित्रपटसृष्टी उपस्थित राहणार आहेत.

राम मंदिराच्या उभारणीच्या कामाला आता वेग आला आहे. ऑक्टोबर २०२३ पर्यंत तळमजल्याचे काम पूर्ण करण्याचे मंदिर ट्रस्टचे उद्दिष्ट आहे. या क्रमाने राम मंदिराच्या १६६ खांबांच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. आता सोमवारपासून बीम लावण्याचे काम सुरू होणार आहे. त्यानंतर छप्पर बांधले जाईल. मंदिर ट्रस्टचे सदस्य डॉ.अनिल मिश्रा यांनी ही माहिती दिली आहे.

'सर्व बीम सुंदर डिझाईन्समध्ये कोरण्यात आले असून ते बांधकामाच्या ठिकाणी पोहोचवण्यात आले आहेत. राम मंदिराचे दरवाजे आणि खिडक्या महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील सागवान लाकडापासून बनवल्या जातील. मंदिराच्या तळमजल्यावर एकूण १२ दरवाजे बसवायचे आहेत. ते तयार करण्याचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती डॉ. अनिल मिश्रा यांनी दिली.

टॅग्स :राम मंदिरचंद्रपूरसुधीर मुनगंटीवार