Join us
Daily Top 2Weekly Top 5

चांदिवलीतील विकासकाला काम बंद करण्याची नोटीस; सुरक्षेसाठी इमारतीच्या ठिकाणी उभारले बॅरिकेटस्

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 04:39 IST

संघर्षनगर येथील ४० फुटांची संरक्षण भिंत सोमवारी रात्री कोसळल्यामुळे तेथील ९० फुटांचा रस्ता खचला.

मुंबई : चांदिवली येथे संघर्षनगरमध्ये सुरू असलेल्या टोलेजंग इमारतीच्या खोदकामामुळे येथील रस्ता खचल्याचा अंदाज प्राथमिक चौकशीतून व्यक्त होत आहे. महापालिकेने संबंधित विकासकाला तत्काळ काम थांबविण्याची नोटीस दिली आहे. २०१७ मध्येदेखील या विकासकाला नोटीस पाठविण्यात आली होती.संघर्षनगर येथील ४० फुटांची संरक्षण भिंत सोमवारी रात्री कोसळल्यामुळे तेथील ९० फुटांचा रस्ता खचला. यामुळे ४० फुटांवर असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गतील आठ मजली दोन इमारतींना धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी खासगी विकासकाचे बांधकाम सुरू आहे. या टोलेजंग इमारतींसाठी वाहनतळ बांधण्याकरिता खोदकाम सुरू होते. यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करीत आहेत. पाहणीनंतर खोदकामामुळेच रस्ता खचल्याचा प्राथमिक अंदाज महापालिकेने व्यक्त केला आहे.महापालिकेच्या एल विभाग कार्यालयाने विकासकाला काम थांबविण्याची नोटीस दिली आहे. याबाबत विचारले असता, घटनास्थळाचे निरीक्षण केल्यानंतर बांधकामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या खोदकामामुळे रस्ता खचल्याचे वाटते. याबाबत विकासकाला नोटीस पाठवून स्ट्रक्चरल आॅडिट, जिओ टेक्नॉलॉजिकल सर्व्हे करून घेण्यास सांगितले असल्याचे, एल विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त मनिष वाळुंजे यांनी सांगितले. एसआरएच्या त्या इमारतींच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी बॅरिकेट्स उभे करण्यात आले आहेत. त्या इमारतींच्या विकासकालाही दुरुस्तीबाबत पालिकेने कळविले आहे.

टॅग्स :मुंबई