वेश्याव्यवसायासाठी चिमुरड्यांचे अपहरण

By Admin | Updated: January 18, 2015 01:47 IST2015-01-18T01:47:12+5:302015-01-18T01:47:12+5:30

नवी मुंबईतून दोन चिमुरड्या मुलींचे अपहरण करणाऱ्या एका वकिलाला व त्याच्या पत्नीला मुंबई गुन्हे शाखेने उरणमधून अटक केली.

Chameleon kidnapping for prostitution | वेश्याव्यवसायासाठी चिमुरड्यांचे अपहरण

वेश्याव्यवसायासाठी चिमुरड्यांचे अपहरण

वकील गजाआड : नवी मुंबईतून अपहृत दोन मुलींची सुटका
मुंबई : लहान मुलींचे अपहरण करायचे, त्यांना वाढवायचे आणि वेश्याव्यवसायाला लावायचे; पुढे त्यांच्या कमाईवर ऐश करायची, या विचाराने नवी मुंबईतून दोन चिमुरड्या मुलींचे अपहरण करणाऱ्या एका वकिलाला व त्याच्या पत्नीला मुंबई गुन्हे शाखेने उरणमधून अटक केली. अ‍ॅड. संजय भोईर व पत्नी रुबी भोईर असे गजाआड झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. रुबी ही पूर्वी बारबाला होती, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. या दोघांनी अशाप्रकारे नवी मुंबई, रायगड परिसरातून आणखी काही मुलींचे अपहरण केले असावे, असा दाट संशय गुन्हे शाखेला आहे.
पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांनी गेल्या १० वर्षांमध्ये हरविलेल्या किंवा अपहृत झालेल्यांचा शोध घेण्यासाठी विशेष शोधमोहीम सुरू केली होती. याच मोहिमेंतर्गत गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि त्यांच्या पथकाला भोईर दाम्पत्याच्या कारनाम्यांची माहिती मिळाली होती. गोपाळे, निरीक्षक दिनकर भोसले, एपीआय दिलीप फुलपगारे, चंद्रकांत दळवी, नितीन पाटील, लक्ष्मीकांत साळुंखे आणि पथकाने भोईर दाम्पत्याची खडान्खडा माहिती
काढून उरण शहरातील त्यांच्या निवासस्थानी धाड घातली. तेव्हा घरात पाचेक वर्षांच्या दोन मुली आढळल्या.
सुरुवातीला या मुली आमच्याच, असा दावा दाम्पत्याने केला. मात्र गुन्हे शाखेच्या चौकशीत त्यांनी या मुलींचे अपहरण केल्याची कबुली दिली. मात्र आम्हाला मूलबाळ नसल्याने हा गुन्हा केल्याची थाप हे दाम्पत्य मारू लागले. अखेर वकिलाआड लपलेला भोईरचा खरा चेहरा समोर आलाच. या मुलींचा सांभाळ करून वाढवून पुढे त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याची कबुली या दोघांनी दिली.(प्रतिनिधी)

वकील देत होता अपहरणाचे कॉन्ट्रॅक्ट
चार-पाच वर्षांच्या मुलींचे अपहरण करण्यासाठी भोईर दाम्पत्य सलमान खान (२२) आणि किशोर ठाकूर (२५) या दोन तरुणांना कॉन्ट्रॅक्ट देत होते, अशी माहिती चौकशीतून समोर आली. त्यानुसार वेगाने हालचाली करून पथकाने या दोघांनाही गजाआड केले. भोईर दाम्पत्याकडून कधी ५० हजार तर कधी एक लाख रुपये प्रत्येक अपहरणामागे मिळत, अशी माहिती या दोघांनी दिली.

मुंबई गुन्हे शाखेने भोईरच्या घरून दोन मुलींची सुटका केली. त्यापैकी एका मुलीचे ७ नोव्हेंबर २०१३ रोजी नेरूळ येथून तर दुसरीचे १७ एप्रिल २०१३ रोजी वाशीच्या इनॉर्बिट मॉल परिसरातून अपहरण करण्यात आले होते. आजपर्यंत या दोन्ही मुली भोईरच्याच घरी राहत होत्या.

Web Title: Chameleon kidnapping for prostitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.