Join us  

टाळेबंदीमुळे मराठी माध्यमाच्या शाळांपुढे विद्यार्थी पटसंख्येचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 5:35 PM

डी. एस. हायस्कूलमध्ये १९० नव्या विद्यार्थ्यांचा प्रवेश; शाळाप्रवेश मोहीमेसाठी व्हिडिओ आणि आर्टवर्कचा वापर करणार

मुंबई : मराठी माध्यमाच्या शाळांबाबतचे पालकांच्या मनातील गैरसमज आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं एकंदरच वाढतं प्रस्थ यांमुळे मराठी माध्यमाच्या शाळांचा विद्यार्थीपट वर्षागणिक घसरत असताना आणि त्यातच करोना टाळेबंदीमुळे निर्माण झालेले  नवीन आव्हान यांमुळे मराठी शाळांमध्ये नव्याने प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या यंदा आणखी घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अशा स्थितीतही सायनच्या शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलमध्ये १९० विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमाच्या शाळेत नव्याने प्रवेश घेतला आहे.गेली सलग तीन वर्षं आमच्या शाळेत ४००हून अधिक विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. मुंबईतली ही सर्वाधिक संख्या आहे. यंदाही आम्ही जानेवारी महिन्यापासूनच नवीन विद्यार्थ्यांसाठीची शाळाप्रवेश मोहीम राबवायला सुरुवात केली होती. मात्र टाळेबंदीमुळे तिच्यात अडथळा निर्माण झाला. पालकांशी हवा तसा पाठपुरावा करता आला नाही. तरीही आमच्या मराठी माध्यमाच्या शाळेत आतापर्यंत १९० विद्यार्थांची नावनोंदणी पालकांनी केली आहे. त्यातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांच्या पालकांनी फीसुद्धा भरली आहे अशी माहिती  डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी विद्यार्थी पटसंख्या राखणे या मराठी माध्यमाच्या शाळांपुढील सर्वात मोठे आव्हान  सांगताना दिली.टाळेबंदीमुळे धारावी-सायन-प्रतीक्षानगर या भागातील कष्टकरी समाज मोठ्या संख्येने गावी गेला आहे. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास अडचणी येत असल्या तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून शाळेचे शिक्षक त्यांच्याशी संपर्क साधत आहेत. टाळेबंदी शिथिल झाल्यावर हे लोक मुंबईत आले की शाळेत नव्याने प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढेल असा विश्वासही राजेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला. एप्रिल-मे महिन्यात शाळेतल्या अनेक शिक्षकांनी पालकांशी झूम अॅपद्वारे संवाद साधून त्यांना त्यांच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेतच घालावं, याविषयी मार्गदर्शन केलं. आता मात्र संपूर्ण जून महिना आम्ही शाळेतील गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विविध उपक्रम यांची माहिती सर्वसामान्य पालकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आकर्षक व्हिडिओ आणि ग्राफिक आर्टवर्क बनवून सोशल मीडियाद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत अशी आम्हितीही त्यांनी दिली.

 

टॅग्स :शिक्षण क्षेत्रकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस