सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचे आव्हान
By Admin | Updated: August 30, 2016 03:40 IST2016-08-30T03:40:14+5:302016-08-30T03:40:14+5:30
१९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर अतिरेक्यांच्या टार्गेटवर असलेल्या मुंबईला सुरक्षित ठेवण्याबरोबरच वाहतूक व्यवस्था सांभाळण्याचे आव्हान पोलिसांसमोर असल्याचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सांगितले

सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचे आव्हान
मुंबई : १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर अतिरेक्यांच्या टार्गेटवर असलेल्या मुंबईला सुरक्षित ठेवण्याबरोबरच वाहतूक व्यवस्था सांभाळण्याचे आव्हान पोलिसांसमोर असल्याचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सांगितले. चर्चगेटच्या इंडीयन मर्चंट चेंबरमध्ये (आयएमसी) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आयएमसीचे अध्यक्ष दीपक प्रेमनारायण, उपाध्यक्ष डॉ. ललीत कनोडीया, माजी मुंबई पोलीस आयुक्त डी. शिवानंदन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘मुंबई पोलिसांसमोरील आव्हाने’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पडसलगीकर यांनी देशसेवेत शहीद झालेल्या पोलिसांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर वाहतुकीची समस्या मुंबई पोलिसांसमोर आव्हान बनत चालल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांवरील हल्ले वाढल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. गेल्याच आठवड्यात खारदांडा येथे वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्यांबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. वाहतूकीसंदर्भातील समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती दिली. मुंबईकरांनी वाहतुकीचे नियम पाळून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. सोशल मीडियावरही याबाबत जनजागृती सुरू आहे. पोलिसांच्या या लढ्यात १२ हजार स्वयंसेवक पुढे आले आहेत, असेही पडसलगीकर यांनी सांगितले.
पडसलगीकर यांनी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. यावेळी सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्याबाबत नागरिकांनी प्रश्न केला. यावेळी उत्तर देताना पडसलगीकर म्हणाले, सायबर क्राईमचा आलेख कमी होण्यासाठी जास्तीत जास्त जनजागृती करण्यात येत आहे. शिवाय याबाबत पोलिसांनाही प्रशिक्षण देण्यात येत आहे. सायबर गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांपासून सायबर क्राईम, सायबर सेल कार्यरत आहेत. तसेच यातील साध्या गुन्ह्यांचा तपास स्थानिक पोलिसांद्वारे करण्यात येतो. तर क्लिष्ट गुन्ह्यांच्या तपासांसाठी सायबर क्राईम अधिक तपास करते. त्यामुळे येत्या काही दिवसांत यावरही नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)