आव्हान हायटेक कार चोरांचे

By Admin | Updated: January 7, 2015 00:24 IST2015-01-07T00:24:41+5:302015-01-07T00:24:41+5:30

महागड्या कार चोरीस जाऊ नये, म्हणून कार कंपन्यांनी डिजिटल की, इलेक्ट्रॉनिक लॉक सिस्टीम अशा अद्ययावत उपाययोजना आणल्या.

Challenge Hi-Tech Car Thieves | आव्हान हायटेक कार चोरांचे

आव्हान हायटेक कार चोरांचे

महागड्या कार चोरीस जाऊ नये, म्हणून कार कंपन्यांनी डिजिटल की, इलेक्ट्रॉनिक लॉक सिस्टीम अशा अद्ययावत उपाययोजना आणल्या. मात्र चोरांपुढे त्या सर्वच थिट्या पडू लागल्या आहेत. या उपायांच्या स्वरूपात असलेले कारचे सुरक्षाचक्र भेदून महागड्या कार उडविण्याचे प्रकार सर्रासपणे मुंबई, नवी मुंबईत घडत आहेत. अशा टेक्नोसॅव्ही चोरांना रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
काही दिवसांपूर्वी कळंबोली पोलिसांनी अमनदीप सिंग आणि राजा नावाच्या अशाच दोन हायटेक चोरट्यांना गजाआड केले होते. या दोघांनी तब्बल ५० हायटेक इनोव्हा कार चावीविना चोरल्याची कबुली दिली होती. या इनोव्हामध्ये अलार्म, सेन्सर, एग्निशनवर नियंत्रण ठेवणारे एसीएम मशिन, डिजिटल चावी अशी संरक्षक यंत्रणा होती. ती भेदण्यासाठी या दोघांनी समोशाच्या आकाराचे यंत्र परदेशातून आयात करवून घेतले होते. कार चोरांच्या जमातीत या यंत्राला सॉकेट म्हणतात. अलार्म वाजविणाऱ्या सेन्सरची वायर आधी उचकटून टाकायची. काच फोडून आत शिरायचे. एग्नेशन कीमध्ये सॉकेट लावून कोड जाणून घ्यायचे. कॉम्प्युटरच्या साहाय्याने ते डिकोड करायचे. त्यानंतर अणकुचीदार हत्यार एग्नेशन कीमध्ये घुसवून ते जोरात फिरवायचे. गाडी स्टार्ट. या जादूचा डेमो पोलिसांनी प्रत्यक्ष पाहिला आहे. गेल्या वर्षात मुंबईतून तब्बल ७० इनोव्हा चोरी झाल्या. त्यापैकी ३५ अशाप्रकारे चोरी झाल्याची माहिती मिळते. अशाचप्रकारे वाहने चोरणाऱ्या टोळीतल्या एका आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
जशी गाडी तशी ती चोरण्याच्या पद्धती. सिंगल की सिस्टीम म्हणजे एकाच चावीने गाडीचे सर्व दरवाजे, पेट्रोल लॉक उघडते आणि गाडीही सुरू होते. अशी व्यवस्था क्वालीस, सुमो, एस्टीम, फियाट, बोलेरो, स्कॉर्पिओ, तवेरा या गाड्यांमध्ये आहे. चोरटे गाडीच्या दारावर लागलेले लॉक पकडीने एका झटक्यात उचकटून काढतात आणि आपल्या गाडीत बसून ‘ब्लँक की’वर कानशीने घासून दाते तयार करतात. थोड्या थोड्या वेळाने चावी लॉकला लागते का ते बघतात. सराईत टोळी चौथ्या-पाचव्या प्रयत्नात बनावट चावी तयार करते. लॉक उघडले याचा अर्थ एग्निशनही सुरू.

सुसाट वेगाने रस्त्यावर धावणाऱ्या एकापेक्षा एक महागड्या गाड्या सर्वांचे लक्ष वेधून घेतात तेव्हा त्या कारमालकाची छाती गर्वाने फुलून येते. पण जेव्हा कारचोरांचे लक्ष त्या गाडीकडे वळते तेव्हा मात्र लाखो रूपयांना गंडा बसतो. या कारचोरांना आळा घालण्यासाठी कारकंपन्या नाना उपाययोजना योजतात. पण एकापुढची एक टेक्नोलॉजी आत्मसात करीत कारचोर त्यावर मात करीत आहेत. कारकंपन्या आणि चोरांच्या शह — काटशहाचा सविस्तर धांडोळा.

अतिरेकी हल्ल्यात चोरीच्या गाड्या
इंडियन मुजाहिदीनने गुजरातेत घडविलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये चोरीच्या व्हॅगनआर गाड्या वापरल्या होत्या. या चारही कार नवी मुंबईतून चोरण्यात आल्या होत्या. याच कारमधून अतिरेकी आणि स्फोटकांची वाहतूक झाली. तसेच याच गाड्यांमध्ये स्फोटके कोंबून त्यांचा स्फोट घडवून आणला गेला. तेव्हापासून वाहनचोरीचे गुन्हे गांभीर्याने तपासले जाऊ लागले.

वाहने चोरणाऱ्या टोळ््यांमध्ये प्रत्येक गाडीला कोडवर्ड आहे. हे कोडवर्ड त्या त्या विभागानुसार बदलतात. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, चोरीच्या गाडीला लगेज म्हटले जाते. क्वालीसला माचीस, पजेरोला प्याज, अल्टोला आलू, स्कॉर्पिओला बिच्छू, वेरनाला जहाज, बोलेरोला बबलू असे सांकेतिक शब्द आहेत.

जीपीआरएसमुळे चोरी झालेली गाडी मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. गाडी कुठे आहे, कुठे जाते आहे हे समजते. पोलिसांच्या मदतीने ती परत मिळवता येते. मात्र वाहनात बसविलेली जीपीआरएस यंत्रणा चोरांच्या हाती लागली तर मात्र गाडीचा शोध लागणे कठीण. कारण चोर जीपीआरएस यंत्र काढून फेकून देतात. त्यामुळे या यंत्राबाबत मालकाशिवाय अन्य कोणालाही माहिती नसावी.

गाडीला कॉम्प्युटराइज्ड चावी असली तरी त्याची डुप्लिकेट बनतेच. रोडसाइड गॅरेज, ड्रायव्हर, वॉचमनकडे चाव्या सोपवून मालक निर्धास्त होतात. पण यापैकीच कोणी तरी विश्वासघात करतो.

शहरात अनेक ठिकाणी कॉम्प्युटर की डुप्लिकेट बनवून मिळते. या तिघांकडून ही चावी गाड्या चोरणाऱ्या टोळीच्या हाती लागू शकते. काही वर्षांपूर्वी दिल्लीत एकाने बनावट चाव्या देणारं यंत्र विकत घेतलं. त्याच्याकडे
लोक येत.

चाव्या बनवून देता देता त्याने सातशेहून अधिक गाड्या लांबवल्या. मालकासोबत तो स्वत:साठी एक चावी बनवून घ्यायचा. गाडीचा रजिस्ट्रेशन नंबरही चावीला जोडायचा. काही महिन्यांनी आरटीओमध्ये जाऊन गाडी मालकाचा पत्ता मिळवायचा आणि गाड्या चोरायचा.

मोबाइलच्या आकाराचे आणि साधारण शंभर ग्रॅम वजनाचे जीपीआरएस यंत्र गाडीत सहज दिसेल अशा ठिकाणी बसवू नये. त्यासाठी आवश्यक असलेली वायरजोडणीही अत्यंत चपखलपणे करावी. गाडी सर्व्हिसिंगला
देताना हे यंत्र काढून घ्यावे. ते परत बसवताना सुरू आहे की नाही, ते तपासून घ्यावे.

१अनुभवी कॉन्स्टेबल गुन्हे शाखेचा कणा मानले जातात. त्यांच्याच जिवावर मुुंबई गुन्हे शाखेने अनेक एन्काउंटर करून अंडरवर्ल्डची दहशत मोडून काढली, गुंतागुंतीचे गुन्हे उलगडून आपली प्रतिमा राखली. पण गेल्या काही दिवसांपासून गुन्हे शाखेचे हे कॉन्स्टेबल अस्वस्थ आहेत. वरिष्ठांकडून घेतला जाणारा रिव्ह्यू त्यांच्यासाठी तापदायक ठरू लागला आहे. रिव्ह्यू घेणाऱ्या अधिकाऱ्याने कॉन्स्टेबलना प्रत्येकी चार कामे (आरोपींना पकडण्याची) टाका, असे बंधन घातले आहे. वर ज्याची खबर काम त्याचे, असा नियमही लावला आहे.

२रिव्ह्यूला जेव्हा हे कॉन्स्टेबल उभे राहतात तेव्हा वरिष्ठ प्रत्येकाची झाडाझडती घेतो. चार कामे नसतील तर वरिष्ठ अंगावर येतो, नको नको ते बोलतो. बरे, कॉन्स्टेबलपर्यंत मर्यादित न राहता त्याने फौजदारापासून युनिटच्या इन्चार्जकडेही चार कामांचा हिशोब मागायला सुरुवात केली आहे. मुळात मुंबई गुन्हे शाखेतल्या प्रत्येक युनिटकडे तोकडे मनुष्यबळ आहे. त्यात काही अधिकारी, कॉन्स्टेबल कोर्टात सुरू असलेल्या केसेसमध्ये, काही बंदोबस्तात तर काही प्रशासकीय कामांमध्ये व्यस्त असतात. उरलेले घडलेल्या मोठ्या, गंभीर गुन्ह्यांची उकल करण्याच्या धडपडीत असतात.

३एक-दोन आरोपींना पकडण्यासाठी किमान तीन-चार कॉन्स्टेबल लागतात. आता खबर ज्या कॉन्स्टेबलची काम त्याच्या नावावर चढणार, या वरिष्ठांच्या फतव्यामुळे जो तो आपापला कोटा पूर्ण करण्यासाठी स्वतंत्रपणे धडपडतोय. एका युनिट एन्चार्जकडे एक वरिष्ठ कामांचा हिशोब मागत होता. तू पकडून युनिटमध्ये ३० जण आहेत. १२० कामांचा हिशोब दे. तेव्हा इन्चार्जने मला हा हिशोब जमणार नाही, काय करायचे ते करा. एकच मोठे, तगडे काम देऊ शकेन, असे सांगून वरिष्ठाचे तोंड बंद केले. सध्या हीच चर्चा गुन्हे शाखेत चवीने होतेय.

Web Title: Challenge Hi-Tech Car Thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.