चारकोपमध्ये चौरंगी लढतीने वाढली चुरस

By Admin | Updated: October 9, 2014 01:35 IST2014-10-09T01:35:36+5:302014-10-09T01:35:36+5:30

प्रत्येक पक्ष स्वबळावर लढणार असल्याने सगळीकडे पंचरंगी लढतीचे चित्र असले तरी चारकोप मतदारसंघामध्ये मात्र चौरंगी लढत रंगणार असेच दिसत आहे

Chakras in four quadrangular fight | चारकोपमध्ये चौरंगी लढतीने वाढली चुरस

चारकोपमध्ये चौरंगी लढतीने वाढली चुरस

रोहित नाईक, मुंबई
प्रत्येक पक्ष स्वबळावर लढणार असल्याने सगळीकडे पंचरंगी लढतीचे चित्र असले तरी चारकोप मतदारसंघामध्ये मात्र चौरंगी लढत रंगणार असेच दिसत आहे. भाजपाचे विद्यमान आमदार योगेश सागर यांची बाजू सध्या तरी भक्कम असली तरी त्यांना शिवसेनेच्या शुभदा गुडेकर, मनसेचे दीपक देसाई आणि काँग्रेसचे भरत पारेख यांच्याकडून जोरदार आव्हान मिळाले आहे. राष्ट्रवादीचे संदेश कोंडविलकरही मैदानात आहेत. आता मतविभागणीचा फायदा कसा आणि कोणाला होईल, याची गणिते मांडण्यात उमेदवारांसह त्यांचे कार्यकर्ते मग्न आहेत.
मराठी व गुजराती भाषिकांचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघावर सुरुवातीपासूनच युतीचे वर्चस्व राहिले आहे. मात्र नुकत्याच झालेल्या ‘महाफुटी’मुळे याच दोन पक्षांत सध्या काँटे की टक्कर पाहायला मिळेल. भाजपाचे उमेदवार व विद्यमान आमदार योगेश सागर यांचा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. पण शिवसेनेच्या शुभदा गुडेकर यांनी त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. कांदिवली स्थानक परिसर, महावीर नगर आणि चारकोप सेक्टर परिसरातील काही भागांमध्ये असलेला गुजराती भाषिक वर्गाचा सागर यांना फायदा होऊ शकतो. शिवाय अजूनही काही प्रमाणात असलेल्या मोदी फॅक्टरचा फायदा होईल, याची
आशा त्यांना वाटणे स्वाभाविक
आहे.
संपूर्ण चारकोप परिसरात शिवसेनेची मजबूत बांधणी आहे. या ठिकाणी असलेला मराठी मतदारवर्ग कायमच शिवसेनेसोबत राहिला आहे. युतीकाळात भाजपाला या मतांनी नेहमीच तारले आहे. तरीदेखील मनसेमुळे मत विभाजनाची टांगती तलवार शिवसेनेवर आहे.
काँग्रेसचे उमेदवार भरत पारेख रिंगणात असले तरीदेखील काँग्रेसलाही मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण मुख्य प्रतिस्पर्धी गुजराती भाषिक आहे. बाभ्रेकर नगर, गणेश नगर अशा झोपडपट्टी परिसरातून काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण आता पुढच्या काही दिवसांतील काँग्रेसची रणनीती त्यांना तारणार की मारणार हे स्पष्ट करणार आहे.
या मतदारसंघातील मनसेचे दीपक देसाई यांची व्यापारी पार्श्वभूमी आहे. स्थानिक व्यापारी गट त्यांच्या पाठीशी आहेत. शिवसेनेची तरुण मते खेचण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. मात्र, तूर्तास तरी मनसेची भूमिका यार्डात उभ्या असलेल्या इंजीनप्रमाणे आहे.
चारकोपमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार कोण हेच अजून मतदारांना नीट कळलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे संदेश कोंडविलकर कितपत मजल मारणार, हे एक मोठे कोडे आहे. ऐनवेळी उमेदवारीची लॉटरी लागलेल्या कोंडविलकर यांना कमी वेळेत मोठी मजल मारायची असल्याने मतदारांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
त्यामुळे यंदा प्रत्येक पक्ष स्वबळावर लढत असल्याने त्यांना काही ना काही प्रमाणात फटका निश्चित बसणार आहे. आता सुज्ञ झालेला मतदार कोणाच्या गळ्यात माळ घालणार, याचा अंदाज बांधणे सर्वांनाच कठीण जात आहे. थोडक्यात काय भाजपाच्या ‘फुलावर’ शिवसेना अचूक ‘नेम’ साधणार का? काँग्रेसचा ‘हात’ दिलासा देणार का? किंवा मनसेचे ‘इंजीन’ वेगात धावणार? असे चित्र चारकोप मतदारसंघात निर्माण झाले आहे. मतांचे विभाजन रोखण्याची क्षमता असलेला उमेदवार चारकोपमध्ये बाजी मारणार एवढे मात्र नक्की.

Web Title: Chakras in four quadrangular fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.