Join us

उर्फीवरून चाकणकर-वाघ यांच्यात जुंपली; महिला आयोगाचा अवमान केला, म्हणून बजावली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 06:14 IST

आयोगाचा अवमान केला म्हणून चाकणकर यांनी वाघ यांना नोटीस बजावली आहे.

मुंबई : मॉडेल  उर्फी जावेद प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि भाजप प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांच्यात जुंपली आहे. आयोगाचा अवमान केला म्हणून चाकणकर यांनी वाघ यांना नोटीस बजावली आहे.

वाघ यांनी उर्फीच्या पेहरावावरून आक्रमक भूमिका घेत  कारवाईची मागणी केली आहे. आयोगाने स्वाधिकारात कारवाई का केली नाही, असा प्रश्न करत त्यांनी आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली होती. आयोगाची अप्रतिष्ठा होईल, अशी वक्तव्ये करुन कामकाजाबाबत समाजात अविश्वास निर्माण होईल, असे वर्तन केल्याचा ठपका नोटीशीत ठेवण्यात आला आहे. दोन दिवसात खुलासा करा. अन्यथा एकतर्फी कार्यवाही करण्यात येईल, असे नोटीशीत नमूद केले आहे.

चित्रा वाघ या आकसापोटी, स्वत:च्या प्रसिद्धीसाठी महिला आयोगाविरोधात भूमिका घेत आहेत.  दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे.- रुपाली चाकणकर, अध्यक्ष राज्य महिला आयोग.

टॅग्स :रुपाली चाकणकरचित्रा वाघ