सुरक्षा रक्षकांचे साखळी उपोषण
By Admin | Updated: August 16, 2014 01:00 IST2014-08-16T01:00:57+5:302014-08-16T01:00:57+5:30
पनवेल येथील ओ.एन.जी.सी. कंपनीच्या सेवेत गेल्या वीस वर्षापासून कंत्राटी कामगार असलेल्या सुरक्षा रक्षकांना गेल्या सात महिन्यांपासून पगार देण्यात आला नाही.

सुरक्षा रक्षकांचे साखळी उपोषण
पनवेल : पनवेल येथील ओ.एन.जी.सी. कंपनीच्या सेवेत गेल्या वीस वर्षापासून कंत्राटी कामगार असलेल्या सुरक्षा रक्षकांना गेल्या सात महिन्यांपासून पगार देण्यात आला नाही. तसेच त्यांच्या बदल्या अन्य ठिकाणी करण्यात आल्या असून त्यांना मिळणाऱ्या अॅडव्हान्सचे ६० हजार रुपये कंपनीने अडवून ठेवल्याच्या निषेधार्थ या कामगारांनी साखळी उपोषण सुरु केले आहे.
ओ.एन.जी.सी.च्या या १२० कंत्राटी सुरक्षा रक्षकांना पाठींबा देण्यासाठी त्यांच्यासोबत या साखळी उपोषणामध्ये प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष आर.डी. घरत, काळुंद्रे ग्रामपंचायतीच्या सरपंच छाया परदेशी, उपसरपंच कैलास म्हसकर, माजी सरपंच बी.आर. परदेशी, आॅईल फिल्ड एम्लॉइज असोसिएशनचे अध्यक्ष शालीग्राम मिश्रा देखील सहभागी झाले आहेत.
१३ आॅगस्टपासून सुरु करण्यात आलेल्या या साखळी उपोषणाला आज आमदार विवेक पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, पंचायत समिती सभापती गोपाळ भगत, जिल्हा परिषद सदस्य अविनाश म्हात्रे, पंचायत समिती सदस्य प्रल्हाद केणी यांनी भेट दिली. यावेळी आमदार विवेक पाटील यांनी उपोषणकर्त्यांना आपला पाठींबा असल्याचे सांगून सदर सुरक्षा रक्षकांच्या मागण्या आपण उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)