Join us

सीईटीचा निकाल जाहीर; मुलांमध्ये अभिजीत कदम, तर मुलींमध्ये जान्हवी मोकाशी अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:56 IST

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटीचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून, या परीक्षेत पीसीबी गटात अभिजीत कदम याने २०० पैकी १८८ गुण मिळवित तर पीसीएम गटात आदित्य अभंग याने २०० पैकी १९५ गुण मिळवित प्रथम क्रमांक मिळविला आहे.

मुंबई : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटीचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून, या परीक्षेत पीसीबी गटात अभिजीत कदम याने २०० पैकी १८८ गुण मिळवित तर पीसीएम गटात आदित्य अभंग याने २०० पैकी १९५ गुण मिळवित प्रथम क्रमांक मिळविला आहे. हे दोघेही राज्यात सर्वसाधारण गटातून प्रथम आले आहेत. पीसीबी गटात जान्हवी मोकाशी हिने, तर पीसीएम गटांत मोना गांधी यांनी मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.मागासवर्गीय उमेदवारांमध्ये प्रशांत वायाळ याने १८२ गुण मिळवित पीसीबी गटांत, तर आदित्य अभंग याने पीसीएम गटांतून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. या परीक्षेत पीसीबी गटात जान्हवी मोकाशी, तर पीसीएम गटांत मोना गांधी यांनी मुलींमध्ये प्रथम येण्याचा मन पटकावला आहे.सीईटी सेलतर्फे जाहीर करण्यात आलेल्या या निकालाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, पीसीबी गटातून १६ हजार ५४८ विद्यार्थ्यांनी १०० हून जास्त गुण मिळविले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा वाढला असून, गेल्या वर्षी १२ हजार ७१२ विद्यार्थ्यांनी १०० हून जास्त गुण मिळविले होते. पीसीएम गटात गेल्या वर्षी २३ हजार ७८ विद्यार्थ्यांनी १०० पेक्षा जास्त गुण मिळविले होते. यंदा हे प्रमाण २२ हजार ८४४ इतके आहे. या परीक्षेमध्ये गणित व रसायनशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकेबाबत घेतलेल्या हरकती प्रकरणी ५ गुण बोनस म्हणून देण्यात आल्याचे सीईटी सेलतर्फे जाहीर करण्यात आले आहे.१० मे २०१८ रोजी झालेल्या या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण यंदा ९६.२८% इतके होते. ३६ जिल्ह्यांतून १,२६० केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातील ४ लाख १९ हजार ४०८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

टॅग्स :शैक्षणिक