प्रमाणपत्रे नंतरच्या आयुक्तांनीच दिली

By Admin | Updated: November 20, 2015 01:27 IST2015-11-20T01:27:33+5:302015-11-20T01:27:33+5:30

‘कॉसमॉस’च्या गृह प्रकल्पांमध्ये आपल्या भावाची भागीदारी असली तरी सर्वकाही नियमानुसार झाल्याचा दावा, ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी केला आहे.

The certificates were given by the later Commissioner | प्रमाणपत्रे नंतरच्या आयुक्तांनीच दिली

प्रमाणपत्रे नंतरच्या आयुक्तांनीच दिली

ठाणे : ‘कॉसमॉस’च्या गृह प्रकल्पांमध्ये आपल्या भावाची भागीदारी असली तरी सर्वकाही नियमानुसार झाल्याचा दावा, ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी केला आहे. सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी हा दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, परमार यांच्या प्रकल्पात पैसे गुंतल्याचा दावा करून रवी पुजारी टोळीच्या नावाने नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनाही ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
परमार यांनी ७ आॅक्टोबर रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. ‘सुसाईड नोट’च्या आधारे ठाणे महापालिकेचे नगरसेवक नजीब मुल्ला, सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण आणि विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे या चौघांच्या विरोधात ३०६ तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. मुल्ला यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात परमार यांच्या प्रकल्पात तत्कालीन पालिका आयुक्त जंत्रे यांच्या बंधूची भागीदारी असल्याचा आरोप करून त्यांच्याही चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार, पोलिसांनी ही चौकशी सुरू केली आहे.
परमार आत्महत्येप्रकरणी भागीदार सुरेश जंत्रे यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसून त्यांच्या अर्थात ‘कॉसमॉस’ ग्रुपच्या प्रकल्पांना जोता आणि भोगवटा प्रमाणपत्र आपल्या नंतरच्या आयुक्तांनीच दिल्याचा खुलासा जंत्रे यांनी केला आहे. यामुळे या प्रकरणात आता तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव आणि असीम गुप्ता यांचीही नावे चर्चेत आली आहेत.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत जंत्रे यांनी परमार यांच्याबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये या गृहप्रकल्पांची मान्यता वैध ठरविल्याचे सांगितले. त्यात कोणत्याही प्रकारची अनियमितता नसल्याचा दावा करून त्यांनी भावाच्या भागीदारीचा या प्रकरणाशी दुरान्वयेही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
यात काही अनियमितता असेल तर डीसी रूल ३३प्रमाणे ही मान्यता रद्द करण्याचे नंतरच्या आयुक्तांनाही अधिकार होते. परंतु, तसे काहीच झालेले नाही, असेही जंत्रे यांनी स्पष्ट केले आहे.

विक्रांत चव्हाणांना धमकी
पुजारी टोळीकडून ठाण्यातील अनेक राजकीय नेत्यांना खंडणीसाठी धमक्यांचे सत्र सुरू आहे. परमार आत्महत्या प्रकरणातील कथित आरोपी विक्र ांत चव्हाण यांनाही त्यांच्या वर्तकनगर येथील कार्यालयाच्या दूरध्वनीवर ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. परमार यांचा मुलगा अभिषेक याला दोनच दिवसांपूर्वी ‘केस आगे मत चलाओ, नही तो देख लूँगा,’ अशी धमकी देण्यात आली होती.
आता परमार यांच्या प्रकल्पात आपले पैसे गुंतले असल्याचे सांगून हे पैसे परत मिळाले नाही, तर नगरसेवक विक्रांत यांना ठार मारण्यात येईल, अशा धमकीचा कॉल परदेशातील क्रमांकावरून त्यांच्या कार्यालयात १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १०च्या सुमारास आला होता. याबाबत वर्तकनगर प्रभाग अध्यक्ष ज्ञानदेव चिकणे यांनी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, अभिषेक परमार यांना आलेल्या धमकीचा अद्याप तपास सुरू असल्याचे नौपाडा पोलिसांनी ‘लोकमत’ला सांगितले.


जंत्रे यांनी दोघा माजी आयुक्तांवरच अप्रत्यक्षपणे रोख धरला. त्यामुळे
आता त्यांच्यानंतरच्या आयुक्तांनाही चौकशीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: The certificates were given by the later Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.