कोरोनामुळे रखडली दिव्यांगांची प्रमाणपत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:05 IST2020-12-08T04:05:44+5:302020-12-08T04:05:44+5:30
कूपर रुग्णालयातील प्रकार; काम ठप्प असल्याने दिव्यांगांची परवड मनोहर कुंभेजकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोविड संसर्गाच्या काळात दिव्यांग ...

कोरोनामुळे रखडली दिव्यांगांची प्रमाणपत्रे
कूपर रुग्णालयातील प्रकार; काम ठप्प असल्याने दिव्यांगांची परवड
मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड संसर्गाच्या काळात दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्रासाठी खूप अडचणी आल्या असून, सध्या हे काम ठप्प आहे. वास्तविक पाहता, विलेपार्ले येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल(कूपर हॉस्पिटल) येथे हे काम कोविड-पूर्व काळात सुरळीत व्हायचे, पण सदर हॉस्पिटल कोविडमध्ये रूपांतरित झाल्यामुळे दिव्यांगांची परवड होत आहे.
दिव्यांगांच्या प्रमाणपत्राबाबत तोडगा काढण्यासाठी राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी कूपर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. पिनाकिन शाह, डॉ.रेडकर, डॉ. भावसार व अन्य प्रशासकीय अधिकारी यांची नुकतीच भेट घेतली. एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला असता, एकूण दिव्यांग प्रमाणपत्रांसाठी १५,४०८ अर्ज आले असून, त्यापैकी ५,७९५ अर्जांचे व्हेरिफिकेशन झाले. अजूनही मोठ्या संख्येने दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती डॉ.दीपक सावंत यांनी ‘लोकमत’ला दिली, तसेच या संदर्भात आपण सदर बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगणार असून, असे पत्र पालिका आयुक्तांनाही देणार आहे, असे त्यांनी सांगितले.
........
याचा बसला फटका
कूपर हॉस्पिटलमध्ये दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यासाठी सध्या कोविडमुळे तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे, तसेच एकाच प्रवेशद्वारातून सर्व रुग्ण व दिव्यांग आले, तर संसर्गाचा धोका असल्यामुळे मध्यंतरीच्या काळात येथे दिव्यांगांना प्रमाणपत्र देऊ शकलो नाही, अशी माहिती डॉ.शाह यांनी दिल्याची माहिती डॉ.सावंत यांनी दिली.
..........
गर्दी नको, त्यासाठी ऑनलाइन मेलद्वारे अर्ज मागवून ठरावीक दिवशी ठरावीक वेळी दिव्यांगांना जर आपण अपॉइंटमेंट देऊन प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करावी. त्यामुळे ठरावीक संख्या असली, तरी दिव्यांगांची गैरसोय होणार नाही. त्याचबरोबर, पूर्व उपनगरातही अजून एक केंद्र उघडणे शक्य असल्यास ते उघडणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांची संख्या विभागली जाईल, असे सावंत यांनी सांगितले.
----------------------------------------