- मनोहर कुंभेजकर
मुंबई: कोविड संसर्गाच्या काळात दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्रासाठी खूप अडचणी आल्या असून आज सदर काम ठप्प आहे. वास्तवीक पाहाता विलेपार्ले येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकिय महाविद्यालय व हॉस्पिटल( कूपर हॉस्पिटल) येथे हे काम कोविड-पूर्व काळात सुरळीत व्हायचे, पण सदर हॉस्पिटल कोविडमध्ये रुपांतरीत झाल्यामुळे, दिव्यांगांची परवड होत आहे.
यावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी दखल घेत कूपर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. पिनाकिन शाह , डॉ . रेडकर, डॉ . भावसार व अन्य प्रशासकीय अधिकारी यांची नुकतीच भेट घेतली. एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला असता, एकूण दिव्यांग प्रमाणपत्रासाठी १५,४०८ अर्ज आले असून त्यापैकी पाच ५७९५ अर्जाची व्हेरिफिकेशन झाले अजूनही मोठ्या संख्येने दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहेत अशी माहिती डॉ.दीपक सावंत यांनी लोकमतला दिली.
कूपर हॉस्पिटलमध्ये दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यासाठी सध्या कोविडमुळे तज्ञ डॉक्टरांची कमतरता असून एकाच प्रवेशद्वारातून सर्व रुग्ण व दिव्यांग आले. तर संसर्गाचा धोका, टेक्निकल स्टाफची कमतरता, सोशल डिस्टेनसिंगचे पालन यामुळे मध्यंतरीच्या काळात येथे दिव्यांग्यांना प्रमाणपत्र देऊ शकलो नाही अशी माहिती डॉ.शाह यांनी दिल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
पूर्व व पश्चिम उपनगरात एकच रुग्णालय असून काही दिव्यांगांना प्रमाणित करण्यासाठी 'न्यूरोफिजिशियन' आर्थोपेडिक सर्जन, मनोविकार तज्ञ यांची गरज आहे. मात्र या अडचणी असल्या तरी आता दिव्यांगांना लगेच प्रमाणपत्र मिळाले पाहिजे अशी आग्रही मागणी डॉ . दीपक सावंत यांनी यावेळी केली.
गर्दी नको त्यासाठी ऑनलाईन मेलद्वारे अर्ज मागवून ठराविक दिवशी ठराविक वेळी दिव्यांगांना जर आपण अपॉइंटमेंट देऊन आपण प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करावी. त्यामुळे ठराविक संख्या असली तरी दिव्यांगांची गैरसोय होणार नाही त्याचबरोबर पूर्व उपनगरातही अजून एक केंद्र उघडणे शक्य असल्यास ते उघडणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांची संख्या विभागली जाईल. या संदर्भात आपण सदर बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगणार असून असे पत्र पालिका आयुक्तांना ही देणार आहे असे त्यांनी सांगितले.
प्रशासनाने येत्या दि,१५ डिसेंबरपासून प्रमाणपत्र द्यावे. अनेक दिव्यांगाना कदाचित लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल फोनचा अभावी ईमेलद्वारे अपॉइंटमेंट घेणे शक्य नसेल किंवा आर्थिक अडचण असेल अशासाठी हॉस्पिटलच्या परिसरात डाटा एंट्री ऑपरेटर द्वारा ई-मेलद्वारे अपॉइंटमेंटची सोय हॉस्पिटल प्रशासनाने नि:शुल्क उपलब्ध करून द्यावी अशी सूचना देखिल त्यांनी यावेळी केली.