Join us  

पोना कार्पोरेशनच्या मालकासह प्रिव्हिलेज हेल्थकेअर कंपनीच्या सीईओला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 5:55 AM

भांडुप पोलिसांची कारवाई; ड्रीम्स मॉल आग प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भांडुप ड्रीम्स मॉल सनराईज रुग्णालय आगप्रकरणी भांडुप पोलिसांनी पोना कार्पोरेशनचे मालक हरेश जोशी आणि प्रिव्हिलेज हेल्थकेअर कंपनीचे सीईओ जॉर्ज पुथ्यू सेरी या दोघांना अटक केली. हरेश जोशी यांनी जॉर्ज पुथ्यू सेरी यांच्यासोबत संगनमत करून स्वतः तसेच सनराईज रुग्णालयाच्या फायद्यासाठी एचडीआयएल ड्रीम्स मॉलची अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसतानाही कार्यक्षम असल्याचे खोटे प्रमाणपत्र अग्निशमन विभागास सादर केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

भांडुप पश्चिमेतील ड्रीम्स मॉलमध्ये २६ मार्च रोजी आग लागली होती. या आगीत मॉलमधील सनराइज कोविड रुग्णालयातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला, तर सुमारे ७६ जण जखमी झाले. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. याप्रकरणी अग्निशमन दलानेही आपला अहवाल तयार केला असून मॉलमधील निष्काळजीपणा या अहवालात उघड झाला आहे. मॉलमधील अग्निरोधक यंत्रणा बंद होती, आग विझविताना अडथळा ठरणारी अवैध बांधकामे आणि मॉल व्यवस्थापनाचा ढिसाळपणा यावर अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शासन मान्यताप्राप्त अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी करणारे पोना कार्पोरेशनचे मालक हरेश जोशी यांनी प्रिव्हिलेज हेल्थकेअर कंपनीचे सीईओ जॉर्ज पुथ्यू सेरी यांच्यासाेबत संगनमत केले. स्वतः च्या फायद्यासाठी एचडीआयएल ड्रीम्स मॉलची अग्नि सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसतानाही ती कार्यक्षम असल्याचे खोटे प्रमाणपत्र अग्निशमन विभागास सादर केले. त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त केल्याचे निष्पन्न होताच दोघांनाही अटक करण्यात आली.  न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :भांडुप पश्चिमआगहॉस्पिटल