Join us

मध्य रेल्वेची वाहतूक पाऊण तास उशिरानं, रुळाला तडे गेल्यानं सेवेवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 09:44 IST

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. कसारा ते सीएसएमटीची वाहतूक विलंबाने सुरू आहे.

मुंबई - ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. कसारा ते सीएसएमटीची वाहतूक विलंबाने सुरू आहे. शहाड रेल्वे स्थानकाजवळ रुळाला तडे गेल्यानं वाहतूक सेवा तब्बल अर्धा ते पाऊण तास उशिरानं सुरू आहे. आंबिवली-शहाड या मुंबईकडे येणा-या अप रेल्वे मार्गावर मंगळवारी सकाळी 8.20 वाजण्याच्या सुमारास रेल्वे रूळाला तडा गेला. दरम्यान, तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. मात्र वाहतूक अद्याप पूर्ववत झालेली नाही. या बिघाडामुळे रेल्वेचं वेळापत्रक पूर्णतः कोलमडलं आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली आहे. 

या मार्गावरील वाहतूक संथगतीने कल्याणच्या दिशेने सुरू आहे. त्यामुळे आसनगाव, टिटवाळा मार्गावरील तीन लोकलच्या प्रवाशांचा लोकलमध्ये खोळंबा झाला. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुळाला तडा गेल्याने वाहतूक ठप्प नसली तरी जेथे बिघाडा झाला आहे, त्या मार्गावरून वाहतुकीचा वेग मर्यादित ठेवण्यात आला होता. 

आसनगाव तसेच टिटवाळा मार्गावरील तीन अप लोकल ठिकठिकाणी संथ गतीने पुढे जात आहेत. सुट्या संपल्याने लोकलमध्ये तुडुंब गर्दी आहे. त्यात लोकलचा वेग मंदावल्याने अधिकच त्रास झाला. नाशिक-इगतपुरीमार्गे येणा-या दोन लांबपल्ल्यांच्या गाड्यांमधील प्रवाशांनाही वेग मंदावल्याने विलंबाला सामोरे जावे लागले. अखेरीस सकाळी 8 वाजून 52 मिनिटांनी बिघाड दुरुस्त करण्यात आला. पण सकाळच्या पहिल्या सत्रात वाहतुकीचा वेग मंदावलेलाच आहे. कसा-याकडे जाणारी वाहतूक मात्र सुरळीत असल्याने त्या मार्गावरून जाणा-या उपनगरीय तसेच लांबपल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांना दिलासा होता.

(अबब! ५ वर्षांत रेल्वे अपघातात 18,423 जणांचा मृत्यू तर 18,874 जण जखमी )

 

 

 

 

टॅग्स :मुंबई ट्रेन अपडेटलोकलमध्य रेल्वे