Join us

आता रेल्वे स्थानकातच कॉर्पोरेट ऑफिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 09:45 IST

रेल्वेकडून ऑफिस स्पेसमध्ये केवळ जागा, लाइट, पंखे यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील

मुंबई : रेल्वे स्थानक केवळ प्रवासाची सोय देणारे ठिकाण न राहता, आता रोजगार व व्यावसायिक उपक्रमाचे केंद्र होणार आहे. मध्य रेल्वेने परळ आणि कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरात कॉर्पोरेट ऑफिसेस सुरू करण्याची योजना आखली आहे. अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत रेल्वे स्थानक परिसरामध्ये उपलब्ध असलेल्या जागेचा वापर योग्यरितीने करून तिकीट विक्री व्यतिरिक्त महसूल वाढविण्यासाठी ही योजना आखल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रवासाच्या सोयीसाठी आपले ऑफिस रेल्वे स्थानकालगत असावे, असा अनेकांचा नेहमीच आग्रह असतो. मध्य रेल्वेच्या नवीन योजनेमुळे आता थेट स्थानकावरच ऑफिस उघडता येणार आहे. परळ स्थानक परिसरात आधीपासूनच अनेक कॉर्पोरेट व व्यावसायिक कार्यालये आहेत, तर कांजूरमार्ग स्थानक परिसर मेट्रो आणि रेल्वे जोडणीमुळे वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे ही दोन्ही स्थानके ऑफिसेस, व्यावसायिक आणि कामगारांसाठी प्रवासाचा वेळ वाचवणारी ठरणार आहे.

मिळणार मूलभूत सुविधा

रेल्वेकडून ऑफिस स्पेसमध्ये केवळ जागा, लाइट, पंखे यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. उर्वरित आवश्यक सुविधा जसे की फर्निचर, इंटरनेट, यांसह इतर आवश्यक सुविधा या कंत्राटदारांना स्वतःच्या गुंतवणुकीतून उपलब्ध करून द्याव्या लागतील. यामुळे व्यवसायिकांना त्यांच्या गरजेनुसार ऑफिस स्पेस तयार करता येणार आहे.

काय आहे योजना ? फायदा काय होणार ? 

भारतीय रेल्वेने सुरू केलेली अमृत भारत स्थानक योजनेच्या माध्यमातून देशभरातील १,३०० हून अधिक स्टेशनांचे टप्प्याटप्याने आधुनिकीकरण करण्यात येत आहे. या योजनेत प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा, आधुनिक पायाभूत सोयी, व्यापारी जागा, स्वच्छता, हरित क्षेत्र आणि तंत्रज्ञान आधारित सेवा पुरवण्यावर भर दिला आहे. स्थानक परिसरातील रिकामी जागा व्यावसायिक उपयोगासाठी उपलब्ध करून देणे हेही या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

वर्षाला ५० कोटींची कमाई

रेल्वे स्थानकात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या नवीन ऑफिस स्पेसमुळे रेल्वेला वार्षिक सुमारे ५० ते ६० कोटी रुपयांचा महसूल उपलब्ध होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

टॅग्स :मुंबई लोकलमुंबईमध्य रेल्वे