मध्य रेल्वेच्या लोकलना पार्किंग समस्या
By Admin | Updated: January 9, 2015 01:58 IST2015-01-09T01:58:33+5:302015-01-09T01:58:33+5:30
मध्य रेल्वेवर लोकल उभे करण्यासाठी जागाच नसल्याने गाड्या सुटण्यास अडचण येत असल्याचे समोर आले आहे.

मध्य रेल्वेच्या लोकलना पार्किंग समस्या
मुंबई : अनेक तांत्रिक बिघाड, फाटकांची अडचण यामुळे लोकल गाड्यांना लेटमार्क लागत असतानाच आता मध्य रेल्वेवर लोकल उभे करण्यासाठी जागाच नसल्याने गाड्या सुटण्यास अडचण येत असल्याचे समोर आले आहे. यामुळे काही लोकल गाड्यांना लेटमार्क लागत असल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
ओव्हरहेड वायर, पेन्टोग्राफ, रुळ तुटणे, सिग्नल यंत्रणेतील बिघाड यामुळे गेल्या काही महिन्यांपासून लोकलना लेटमार्क लागत आहे. ठाकुर्ली येथे पेन्टोग्राफच्या समस्येमुळे दिवा, डोंबिवली, मुंब्रा येथे प्रवाशांचा उद्रेक झाला होता. तांत्रिक बिघाडांची समस्या रेल्वेला सतावत असतानाच फाटकांमुळेही रेल्वे प्रशासन त्रस्त झाले आहे. ठाकुर्ली, कल्याण, दिवा, कळवा, आंबिवली आणि हार्बरवरील कुर्ला फाटकामुळेही दररोज ९0 लोकलना लेटमार्क लागत आहे. ही दोन महत्त्वाची कारणे लोकल गाड्यांना लेटमार्कसाठी ठरत असताना आता पार्किंगची जागाच उपलब्ध नसल्यानेही लोकल उशिराने धावत असल्याचे समोर आले आहे. याचा सर्वात मोठा फटका ठाणेपुढील कर्जत, कसारा, खोपोलीच्या प्रवाशांना बसत आहे.
कर्जतमध्ये रात्री सध्या सहा लोकल गाड्यांना उभे करण्यासाठी तर कसारामध्ये दोन लोकलना पार्किंगसाठी जागा असून खोपोलीत एकही जागा उपलब्ध नाही. त्यामुळे येथून सुटणाऱ्या गाड्यांना तांत्रिक अडचण येत असून, जागेच्या अडचणीमुळे लोकल गाड्यांना लेटमार्क लागत आहे.
ठाणे, कल्याण, डोंबिवली ते कसारा, कर्जत, खोपोली दरम्यान धावणाऱ्या लोकलना मोठा फटका बसत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगितले.
कसारात तीन आणि खोपोलीत दोन लाईन पार्किंगसाठी प्रस्तावित असून, जागाच नसल्याने लाईन बनण्यास अडचण येत आहेत. त्याचप्रमाणे कर्जतमध्येही सहा
लाईन पार्किंगसाठी असल्या तरी आणखी काही लाईन उपलब्ध असावेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)