Mumbai Central Railway: मध्य रेल्वेने एप्रिल ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत १७ लाख १९ हजार विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली. या फुकट्या प्रवाशांकडून १०० कोटी ५० लाख रुपयांचा दंड वसूल केला. ऑगस्ट महिन्यात २ लाख ७६ हजार विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात २ लाख ३४ हजार फुकटे प्रवासी पकडले होते.
रेल्वे प्रवाशांना झटपट तिकीट काढता यावे यासाठी स्थानकातील खिडक्यांसह एटीव्हीएम, मोबाइल तिकिटाचा पर्याय उपलब्ध आहे, तरीही काही प्रवासी सर्रास विनातिकीट प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रवाशांवर टीसीद्वारे कारवाई केली जाते. गेल्या ऑगस्ट महिन्यात विनातिकीट प्रवाशांकडून ८ कोटी ८५ लाखांचा दंड वसूल केला होता. यंदा विनातिकीट प्रवाशांच्या संख्येत आणि दंडाच्या रकमेत देखील वाढ झाली आहे. यंदाच्या ऑगस्ट महिन्यात १३ कोटी ७८ लाखांचा दंड विनातिकीट प्रवाशांकडून आकारला आहे.