ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे कोलमडली
By Admin | Updated: October 30, 2015 01:03 IST2015-10-30T01:03:10+5:302015-10-30T01:03:10+5:30
मध्य रेल्वे विस्कळीत होण्याची मालिका सुरूच असून, गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय प्रवाशांना आला. दिवाजवळील पारसिक बोगद्याजवळ रुळाला

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे कोलमडली
मुंबई : मध्य रेल्वे विस्कळीत होण्याची मालिका सुरूच असून, गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय प्रवाशांना आला. दिवाजवळील पारसिक बोगद्याजवळ रुळाला तडे गेल्याने, ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे कोलमडली आणि तब्बल दिवसभरात १३0 लोकल फेऱ्यांना फटका बसला. यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना लेटमार्कला सामोरे जावे लागले.
सकाळी पावणे आठच्या सुमारास दिवा स्थानकाजवळील पारसिक बोगद्याजवळ रुळाला तडे गेल्याची घटना घडली. सीएसटीकडे येणाऱ्या जलद मार्गावर रुळाला तडा गेल्याने प्रवाशांना मोठ्या मन:स्तापाला सामोरे जावे लागले. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेकडून रुळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. काम पूर्ण करण्यासाठी तब्बल ५0 मिनिटांचा कालावधी लागल्याने, सीएसटीकडे येणाऱ्या लोकलचा चांगलाच बोऱ्या वाजला आणि तब्बल २० मिनिटे लोकल उशिराने धावू लागल्या. त्यामुळे लोकल गाड्यांना प्रचंड गर्दी झाली आणि या गर्दीतूनच प्रवाशांना कसाबसा प्रवास करावा लागला. १३0 लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.