मुंबई/ठाणे : रक्षाबंधनाचा सण साजरा करून सहकुटुंब घरी परतणाऱ्या भाऊ आणि बहिणींना मध्य रेल्वेने शनिवारी रात्री मेगाब्लॉकद्वारे अक्षरशः वेठीस धरले. रात्री ११ नंतर ठाण्यापासून पुढे कर्जत-कसाऱ्याच्या दिशेने एकही लोकल न धावल्यामुळे हजारो प्रवासी ठाणे स्थानकामध्ये अडकून पडले. ही केविलवाणी अवस्था पाहून ओला, उबर आणि रिक्षाचालकांनी 'लूट' सुरू केली. त्यामुळे अनेक जण पहाटेपर्यंत रेल्वे स्थानकात अडकून पडले.
मध्य रेल्वेने ठाकुर्ली आणि कल्याण, तसेच अंबरनाथ, बदलापूरदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर शनिवारी रात्रीपासून रविवार सकाळपर्यंत मेगाब्लॉक घेतला होता. रक्षाबंधनाच्या दिवशी भावांकडे गेलेल्या बहिणी अडकून पडल्या. मेगाब्लॉक घेण्याची कल्पना अंमलात आणली त्यांच्या नावाने प्रवाशांनी लाखोली वाहिली. रात्री ११ वाजून २३ मिनिटांची शेवटची खोपोली लोकल रवाना झाली. ज्यांना डोंबिवली, कल्याणला जायचे आहे, त्यांनी या लोकलने जाण्याची सूचना झाली; परंतु ही लोकल भरलेली होती.
अनेकांना रात्रीपासून मेगाब्लॉक आहे, याची कल्पना नसल्याने रात्री सव्वाअकरा वाजल्यापासून पहाटेपर्यंत हजारो प्रवासी ठाणे स्थानक परिसरात अडकून पडले. काहींनी ओला, उबर सेवेचा आधार घेण्याचा किंवा या परिसरातील रिक्षाचालकांना मुंब्रा, डोंबिवली, कल्याणकडे येण्यासाठी विनवण्या करण्यास सुरुवात केली.
'रेल्वे अधिकाऱ्यांना सणांची माहिती नाही'
मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गावर शनिवारी रात्रकालीन 'ब्लॉक' घेतल्यामुळे मुंबईतील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. काही प्रवाशांनी नातेवाइकांकडेच मुक्काम केला.
ऐन सणासुदीत रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतल्याने अनेकांनी संताप व्यक्त २ केला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेश मीना यांना मुंबईच्या प्रवाशांची आणि येथील सणांची माहिती नसल्याने हा गोंधळ झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला. ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (सीएसएमटी) सुटणाऱ्या आणि सीएसटीकडे येणाऱ्या अनेक लोकल शनिवारी रात्री १०:४० पासून रद्द करण्यात आल्या होत्या.
२०० पेक्षा जास्त लोकल रद्द
मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक नसल्याचे प्रवाशासनाने जाहीर केले होते. ब्लॉक नसतानाही २०० पेक्षा जास्त लोकल रद्द करण्यात आल्याचे रेल्वेच्या अॅपवर दाखवत होते. गणेश आगमन सोहळे पाहण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांचा रविवारीही खोळंबा झाला होता. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रविवारच्या वेळापत्रकामुळे या गाड्या रद्द करण्यात आल्या.
भाऊबीज करून कल्याणच्या दिशेने घरी परतण्यासाठी शनिवारी रात्री १०:५५ ला भायखळावरून जलद लोकल नसल्याने त्यांनी धिमी लोकल पकडली. त्या लोकलने घाटकोपरला पोहचायला साधारण रात्री १ वाजला. सणासुदीच्या काळात प्रवाशांना त्रास देण्याचे काम प्रशासनाने केले आहे- अक्षय साटपे, प्रवासी