विकासकामांना केंद्रीय निधी; २७ गावांची स्मार्ट सिटीसाठी शिफारस
By Admin | Updated: August 25, 2014 00:11 IST2014-08-25T00:11:48+5:302014-08-25T00:11:48+5:30
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील २७ गावे वगळण्यात आली होती. ही गावे ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच नवी मुंबई महापालिकांच्या हद्दीलगत असून मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणात समाविष्ट आहेत.

विकासकामांना केंद्रीय निधी; २७ गावांची स्मार्ट सिटीसाठी शिफारस
डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रश्नांवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांची सह्याद्री अतिथीगृहात शुक्रवारी भेट घेऊन त्यांना आपल्या मतदारसंघातील २७ गावांची निवड स्मार्ट सिटीसाठी केली जावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन सादर केले.
कल्याण-डोंबिवली तसेच उल्हासनगर महानगरपालिका आणि अंबरनाथ नगर परिषद यांनी प्रस्तावित केलेल्या पाणी, सिवरेज, रस्ते याबरोबरच ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो प्रकल्प या लोकहिताच्या विकासकामांना विकास निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करून त्यांनी या प्रकल्पांची यादीही त्यांना दिली.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील २७ गावे वगळण्यात आली होती. ही गावे ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच नवी मुंबई महापालिकांच्या हद्दीलगत असून मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणात समाविष्ट आहेत.
राज्य शासनाने ४८.४३ चौ.कि.मी. क्षेत्रातील या २७ गावांसाठी तयार केलेला विकास आराखडा अंतिम टप्प्यात आहे. त्यासोबतच हा भाग विरार-अलिबाग बहुआयामी डीएमएफसीमध्ये येतो. ठाणे व कल्याण आणि प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या अतिशय जवळ असल्यामुळे ही २७ गावे केंद्रीय स्मार्ट सिटी योजनेच्या अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरणारी असल्याने येथे स्मार्ट सिटी उभारावी, अशीही शिंदे यांनी आग्रही मागणी केली.
यावर केंद्रीय मंत्र्यांनी प्रकल्पांबाबत सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे.