Join us
Daily Top 2Weekly Top 5

विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 06:05 IST

दिवसभरात ८५० विमाने रद्द, प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट; कंपनीला हवी वेळापत्रकात आणखी सूट, तिकिटांचे पैसे तत्काळ परत करण्याचे डीजीसीएचे कंपनीला आदेश; इंडिगो म्हणाली, ‘प्रवाशांचे पैसे देण्यास आमचे प्राधान्य’, विमानाच्या मदतीला रेल्वे

मुंबई : वेळापत्रकाचा बोजवारा उडाल्यानंतर इंडिगो कंपनीच्या विमानसेवेचा घोळ चौथ्या दिवशीही कायम होता. शनिवारी दिवसभरात इंडिगोची ८५० उड्डाणे रद्द झाली. हा गोंधळ निस्तरण्यासाठी इंडिगोने १० फेब्रुवारीपर्यंत वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांच्या वेळापत्रकात सूट देण्याची मागणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीए)  केली आहे. त्यावर डीजीसीएने अद्याप उत्तर दिलेले नाही. परंतु, या गोंधळाबाबत डीजीसीएने इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

इंडिगोचा हा घोळ सुरू असतानाच इतर विमान कंपन्यांनी आपले तिकीट दर भरमसाठ वाढवल्याने प्रवाशांच्या त्रासात आणखीनच भर पडली. त्याची दखल घेत केंद्र सरकारने विमान कंपन्यांना तिकीट दर वाढविण्यास प्रतिबंध केला आहे. डीजीसीएने हवाई सेवा सुरळीत होईपर्यंत सर्व विमान कंपन्यांना तिकीट दर ठरवून दिले आहेत.  

चार दिवसांत इंडिगोची जवळपास २,८०० उड्डाणे रद्द झाली, तर शनिवारी दिवसभरात सहा महानगरांतून होणाऱ्या इंडिगोच्या उड्डाणांमध्ये ३.७ टक्क्याने घट झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उड्डाणे रद्द झाल्यानंतर डीजीसीएने प्रवाशांना तातडीने त्यांच्या तिकीटांचे संपूर्ण पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश न पाळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असाही इशारा दिला आहे. इंडिगोने प्रवाशांचे पैसे देण्यास आमचे प्राधान्य असेल असे उत्तर दिले आहे. प्रवाशांच्या हिताला प्राधान्य असल्याचेही इंडिगोने म्हटले आहे.

विमानतळावरच रंगली मैफल...

मुंबई ते पुणे या प्रवासासाठी लटकलेल्या एका गायकाने विमानतळावरच आपली गिटार वाजवत गाणी गाण्यास सुरुवात केली. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. झ्यान रझा असे या गायकाचे नाव आहे. बराचवेळ बसून वैतागल्यानंतर त्याने बॅगेतून गिटार काढत ‘वो लम्हे’ हे गाणे गायला सुरुवात केली. ताटकळत बसलेल्या प्रवाशांनी ताल धरला.

परदेशी महिलेचा संयम सुटला...

आपले विमान रद्द झाले किंवा पर्यायी काय व्यवस्था आहे, अशी विचारणा करत एका परदेशी महिलेचा संयम सुटला आणि मुंबई विमानतळावरील काऊंटरवर चढून तिने कंपनी कर्मचाऱ्यांशी जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली. आपल्याला अन्न हवे आहे, पाणी हवे आहे. इतक्या किमान गोष्टी तरी तुम्ही करू शकत नाहीत का, असा सवाल तिचा होता.

दरनिर्बंध...

प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यात कंपन्यांनी आकारलेले अव्वाच्या सव्वा दर पाहता शनिवारी सरकारने देशांतर्गत विमान कंपन्यांवर दरनिर्बंध लावले आहेत. हे दर जोपर्यंत देशातील हवाई सेवा सुरळीत होत नाहीत तोपर्यंत लागू राहतील असे  सरकारने स्पष्ट केले आहे.

डीजीसीएने ठरवून दिले तिकिटाचे दर 

अंतर   कमाल भाडे (रुपयात)

५०० किमीपर्यंत  ७,५००

५०० ते १,००० किमी     १२,०००

१,००० ते १,५०० किमी    १५,०००

१,५०० किमीहून अधिक   १८,०००

English
हिंदी सारांश
Web Title : Indigo flight chaos continues; Government caps airfares amid disruptions.

Web Summary : Indigo faces DGCA notice as flight cancellations persist. Government intervenes, capping airfares due to other airlines' price hikes. Passengers faced airport chaos; refunds ordered.
टॅग्स :इंडिगोविमानतळ