स्मशानात कर्मचारी नाहीत, अंत्ययात्रा मुख्यालय परिसरात
By Admin | Updated: December 2, 2014 00:41 IST2014-12-02T00:41:58+5:302014-12-02T00:41:58+5:30
काशिमिराच्या काशिगाव परिसरात असलेल्या मांडवी पाडा येथे राहणाय््राा मंजु गुप्ता या २६ नोव्हेंबर रोजी त्यांच्या अंगावर दिवा पडल्याने गंभीर भाजल्या होत्या.

स्मशानात कर्मचारी नाहीत, अंत्ययात्रा मुख्यालय परिसरात
भार्इंदर : पालिकेच्या काशिमिरा स्मशानभूमीत कर्मचारीच उपलब्ध नसल्याने पाच तासांहून अधिक काळ अंत्यविधीसाठी ताटकळणा-या महिलेचा मृतदेह संतापलेल्या नातेवाईकांनी थेट मुख्यालयातच आणल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
काशिमिराच्या काशिगाव परिसरात असलेल्या मांडवी पाडा येथे राहणाय््राा मंजु गुप्ता या २६ नोव्हेंबर रोजी त्यांच्या अंगावर दिवा पडल्याने गंभीर भाजल्या होत्या. त्यांना उपचारासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सोमवारी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह दुपारच्या सुमारास मांडवी पाडा येथे आणण्यात आला होता. अंत्ययात्रेचे विधी पार पडल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी सायंकाळी ४ वा. च्या सुमारास काशिमिरा स्मशानभूमीत आणण्यात आला. परंतु, तेथे एकही कर्मचारी हजर नसल्याने त्याची माहिती भाजपाचे स्थानिक नगरसेवक अनिल भोसले यांना देण्यात आली. भोसले यांनी अंत्यविधीसाठी कर्मचारी उपलब्ध करुन देण्याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांना मोबाईलवरुन संपर्क साधला असता सुरुवातीला तो उचलण्यात आला नाही.
काही वेळानंतर अधिकाऱ्यांनी स्मशानात कर्मचारी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन भोसले यांना दिले. परंतु, रात्री ८ वा. पर्यंत एकही कर्मचारी स्मशानात उपस्थित न झाल्याने संतप्त नातेवाईकांसह भोसले यांनी अंत्ययात्रा थेट पालिका मुख्यालयात आणली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
याची कुणकुण भार्इंदर पोलिसांना लागताच पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेत भोसले यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, मृताच्या नातेवाईकांचे समाधान होत नव्हते. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने प्रशासनाने कर्मचारी उपलब्ध करुन दिल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेह अंत्यविधीसाठी काशिमिरा स्मशानभूमीत नेला.
याबाबत पालिका आयुक्त सुभाष लाखे यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (प्रतिनिधी)