शहर आणि उपनगरातील प्रदूषणकारी काँक्रीट प्लांटवर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) कारवाई सुरू केली खरी, मात्र या प्लांटमधून काँक्रीट नेणाऱ्या मिक्सरला वेसण घालण्यात महापालिका आणि मंडळ आजही अपयशी ठरले आहे. मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या संख्येने धावणाऱ्या या सिमेंट मिक्सरमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी आणि वायुप्रदूषण होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
मात्र, या प्रदूषणाबाबत सगळ्याच यंत्रणांनी दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. त्याचा फटका प्रामुख्याने प्लांटलगतच्या लोकवस्त्यांसह प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसताना दिसत आहे. त्याबाबत तक्रारी केल्यानंतरही संबंधित यंत्रणाकडून ठोस कारवाई होत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
चांदिवलीतील रहिवाशांना आरोग्याच्या समस्याकाँक्रिट प्लांटमुळे होणाऱ्या वायुप्रदूषणामुळे चांदिवली परिसरातील रहिवासी गेल्या दोन वर्षांपासून हैराण झाले आहेत. मात्र त्याकडे यंत्रणांकडून दुर्लक्ष केले जात आहे.
रहिवासी क्षेत्रातील या प्लांटमुळे स्थानिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. दोन वर्षे तक्रार करुनही महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केलेली नाही.
येथे नियम धाब्यावर बसवत काम केले जात असून मिक्सर वाहनाच्या टायरांना लागलेली रेती, माती रस्त्यावर पसरत आहे, असे चांदिवली सिटीझन्स वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक मनदीपसिंग मक्कर यांनी सांगितले.
मालाड-मालवणीमध्ये रस्त्यावर धूळमालाड-मालवणी येथील सिमेंट काँक्रीटच्या प्लांटमुळे होणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषणाविरोधात विनोद घोलप यांनी महापालिकेकडे तक्रार केली होती.
या प्लांटमधून बाहेर पडणाऱ्या मिक्सरच्या टायरना लागलेली धूळ, सिमेंट रस्त्यावर पसरत आहे. त्याचा त्रास स्थानिकांना होत आहे. मात्र, या कारवाई शून्य आहे.
एलबीएसवर मिक्सर, डेब्रिज, अवजड वाहनेलालबहादूर शास्त्री मार्गावर सायन ते मुलुंडपर्यंत मोठ्या प्रमाणावर मिक्सर, बांधकामाच्या साहित्यासह डेब्रिज वाहून नेणारी अवजड वाहने धावत असतात. ताडपत्रीने ही वाहने झाकणे गरजेचे आहे. मात्र, ती अर्धवट झाकली जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे या वाहनांतून डेब्रिज, रेती, सिमेंटचे कण रस्त्यावर पडतात तसेच वातावरणात मिसळतात, असे रहिवासी राकेश पाटील यांनी सांगितले.
१०,४०० टन डेब्रिज गोळाशहर आणि उपनगरात बांधकामांचे डेब्रिज कुठेही बेकायदा टाकले जाते. त्यामुळे त्याची शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी पालिकेने डेब्रिज ऑन कॉल सेवा सुरू केली आहे. गेल्या दोन महिन्यांत याद्वारे एक हजार ५०० फोन महापालिकेला आले आहेत. यातून १० हजार ४०० मेट्रिक टन डेब्रिज गोळा करण्यात आले आहे.
बांधकामाशी संबंधित वाहनांसाठी सूचना१. बांधकामाशी संबंधित प्रत्येक वाहनाची पीयूसी चाचणी करणे आवश्यक आहे. ती झाली नसल्याचे आढळून आल्यास त्यावर परिवहन विभागाने तत्काळ कारवाई करावी. २. बांधकाम साहित्य तसेच राडारोडा ने-आण करणारे वाहन झाकलेले असावे. वाहनांची वजन मर्याद पाळावा. ३. राडारोडा ने-आण करताना, प्रत्येक खेपेच्या वेळी तुषार फवारणी करावी. तसेच वाहनांची चाके प्रत्येक खेपेनंतर धुवून स्वच्छ करावीत. ४. वाहनांच्या चाकांची प्रत्येक खेपेनंतर व्यवस्थित स्वच्छता केली जात आहे. याची खातरजमा व्हावी, यासाठी प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत.