Join us  

आज जगभरात किर्तीवंत ठरलेल्या या सेलिब्रिटींनी केली होती मुंबईतून सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 5:19 PM

यांचा जन्म किंवा मुळ मुंबईकर नसलं तरी ते स्वत:ला मुंबईकर मानतात. आज ते यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहेत.

ठळक मुद्देजगभरात आपली किर्ती पसरवलेले हे महान लोक मुंबईशी संबंधीत असल्याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे.आपल्या करि अरसाठी, शिक्षणासाठी किंवा रोजंदारीसाठी मुंबईत स्थायिक झालेल्या या व्यक्ती आज मुंबईची शान आहेत.

मुंबई : आपल्या स्वप्नांचा माग काढत, करिअरला दिशा देण्यासाठी अनेक स्वप्नाळू मुंबईत आपलं नशीब आजमावायला येत असतात. त्यातील कित्येकांची स्वप्नंही साकार झाली आहेत. म्हणूनच मुंबईला स्वप्नांचं शहर, सिटी ऑफ ड्रीम असं म्हणतात. पण मुंबईने अशी काही माणसं घडवली ज्यामुळे केवळ मुंबईकरांचीच मान उंचावली नाही तर संपूर्ण जगाने त्यांची दखल घेतलीय. आज आपण अशाच काही मुंबईकरांविषयी पाहुया.

सुनिल गावसकर

सुनिल गावसकर यांच्याविषयी याआधी आपण पाहिलंच आहे. १९४९ साली त्यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांच्या घरातच खेळाचं वातावरण असल्याने त्यांनीही आपलं करिअर खेळातच करायचं ठरवलं. क्रिकेटमय वातावरणात वाढल्यामुळे सुनिल यांना लहानपणापासूनच क्रिकटची आवड निर्माण झाली होती. ओपनिंग बॅट्समन म्हणून त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. टेस्ट मॅचमध्ये त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले असून मुंबई क्रिकेट पत्रकार संघातर्फेही त्यांना जीवनगौरव देण्यात आला आहे. 

रतन टाटा

जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये ज्यांची आपण गणना करतो ते रतन टाटाही मुंबईतीलच. २८ डिसेंबर १९३७ साली मुंबईत त्यांचा जन्म झाला. लहानपणाची आई-वडिल विभक्त झाल्याने त्यांच्या आजीने त्यांचा सांभाळ केला. त्यानंतर अमेरिकेत जाऊन त्यांनी मॅनेजमेंटची पदवी घेतली. शिक्षण घेत असताना त्यांना हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनापर्यंत सगळी कामं करावी लागली. त्यांची ही जिद्द पाहून प्रभावित झालेले टाटा समुहाचे तत्कालीन प्रमुख जे.आर.डी. टाटा यांनी त्यांना टाटा उद्योग समुहात काम करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याच काळात ते आपल्या आजीला भेटायला भारतात आले होते. त्यांनी हा प्रस्ताव तत्काळ स्विकारला. तेव्हापासून ते टाटा समुहात आहेत. मात्र समूहाच्या परंपरेनुसार १९६२ ते १९७१ त्यांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले. जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीत काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच १९७१ मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपविण्यात आली. नेल्को ही तोट्यात चालणारी कंपनी होती. रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी ही कंपनी पुढील तीन वर्षांमध्ये स्वतःच्या पायावर उभी करण्यात रतन टाटा यांनी यश मिळविले. आता ते प्रसिद्ध आणि यशस्वी उद्योजक म्हणून जगभर किर्ती मिळवत आहेत.

लता मंगेशकर

गानकोकीळा म्हणून जगभर प्रसिद्धीस आलेल्या लता मंगेशकर यांचा जन्म इंदौर, मध्य प्रेदशातील असला तरीही त्यांचं अर्ध्याधिक अधिक आयुष्य मुंबईत गेले. लताताई अवघ्या १३ वर्षांच्या असताना त्यांचे वडिल वारले. तेव्हा त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी मास्टर विनायक यांनी घेतली. १९४५ साली मास्टर विनायक यांच्या कंपनीचे मुंबईत स्थलांतर झाले. तेव्हा लता मंगेशकरही त्यांच्यासोबत मुंबई आल्या. मुंबईत आल्यावर त्यांनी हजारो मराठी, हिंदी चित्रपटांसाठी गाणी गायली. त्यांचा आवाज इतका गोड होता की परदेशातूनही त्यांच्या गाण्याला बरीच मागणी असते. जगभरात त्यांनी आपल्या गाण्याने बरीच किर्ती मिळवली. २००९ साली त्यांना भारतरत्न देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे अनेक चित्रपटांसाठी फिल्मफेअर अॅवॉर्डसही मिळाली आहेत. म्हणून मुंबईकरांना त्यांचा फार अभिमान आहे.

धिरुभाई अंबानी

मुळचे गुजरातचे असलेले आणि आपल्या व्यवसायाची सुरुवात एडन येथून करणारे धिरुभाई अंबानी यांनी मुंबईतही वास्तव्य केले होते. वयाच्या ६९ व्या वर्षी स्ट्रोकच्या आजाराने २००२ साली निधन झाले. १९५९ साली धीरुभाई अंबानी यांनी १५ हजार रुपयांची गुंतवणूक करून मशीदबंदर येथे त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी यांच्यासह ६५:३५ अशी भागीदारी करून रिलायन्स कमर्शिअल कॉर्पोरेशनची स्थापना केली. मुंबईला आल्यावर धीरूभाई सर्व कुटंबीयांसह जिच्यात सुमारे ५०० कुटुंबे रहात होती अशा एका चाळीत भुलेश्वर येथे राहू लागले. त्यांची मुलं मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी हे सुद्धा आता मुंबईतच राहतात. 

आणखी वाचा - जगभरातील श्रीमंतांपैकी या व्यावसायिकांचे मुंबईशी असं कनेक्शन

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन! सिर्फ नाम ही काफी है! मुळचे अलाहाबादचे असलेले अमिताभ बच्चन यांनी मुंबईत येऊनच आपली किर्ती जगभर पोहोचवली. बिग बी, शहेनशाह, अॅँग्री यंग मॅन अशा विविध नावांनी बॉलिवडूमध्ये नाव कमावलं. स्ट्रगल करून स्वत:च्या हिंमतीवर एवढी मजल मारणारे अमिताभ बच्चन सगळ्याच नवकलाकारांसाठी प्रेरणादायी ठरलेले आहेत. गेल्या ३ दशकात त्यांनी रसिक प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाने खिळवून ठेवलंय. १८० हून अधिक चित्रपटात त्यांनी काम केलं असून काही चित्रपटांमध्ये त्यांनी पार्श्वगायक आणि निर्मितीचेही काम केले आहे. ऐन तारुण्यात कोलकत्यातील एका जहाजवाहतूक कंपनीतील एजंटची नोकरी सोडून देऊन अभिनयात कारकीर्द करण्यासाठी मुंबईत आलेल्या बिग बींनी मुंबईकरांची मान उंचावली आहे. 

आणखी वाचा - मतभेद असले तरी अमिताभ यांच्या वैभवशाली कलाकिर्दीबद्दल, श्रेष्ठत्वाबद्दल माझ्या मनात शंका नव्हती 

सचिन तेंडूलकर

१९७३ साली सचिन तेंडूलकर यांचा जन्म मुंबईत झाला. मुंबईतल्या शिवाजी पार्कपासूनच त्यांनी त्यांच्या खेळाची सुरुवात केली. क्रिकेटमध्ये जगभरात त्यांनी किर्ती मिळवली. वनडेमध्ये डबल सेन्चुरी करणारे सचिन तेंडूलकर हे पहिले खेळाडू आहेत. सचिनला आतापर्यंत पद्मविभूषण, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त झाले आहे. तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला भारतभूषणही त्यांना त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी जाहिर झाला होता. सचिन तेंडूलकर यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी मुंबईच असल्याने मुंबकरांना सचिन तेंडूलकरचा प्रचंड अभिमान आहे.

आणखी वाचा - तरुणांनी साकारलेल्या सचिनच्या रांगोळीची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये

टॅग्स :अमिताभ बच्चनसचिन तेंडूलकरलता मंगेशकररतन टाटा