सेलीब्रिटींनीही बजावला राष्ट्रीय हक्क
By Admin | Updated: October 15, 2014 23:19 IST2014-10-15T23:19:15+5:302014-10-15T23:19:15+5:30
सामान्य मतदारांप्रमाणेच राज्यभरात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

सेलीब्रिटींनीही बजावला राष्ट्रीय हक्क
मुंबई : सामान्य मतदारांप्रमाणेच राज्यभरात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. राज्यभरात बुधवारी पार पडलेल्या मतदानासाठी मतदान करीत सोशल नेटवर्किंग साइट्सवर आपले ‘सेल्फीज’ अपलोड करण्यातही ही मंडळी आघाडीवर होती.
लोकसभा निवडणुकीत नावे गायब असल्याचा फटका काही सेलीब्रिटींनाही बसला होता. त्यानंतर याबाबत जागरूकता दाखवित विधानसभा निवडणुकीसाठी नोंद करण्याचा निर्धार सेलीब्रिटींनी बाळगला. मुंबई उपनगरांतील वांद्रे, जुहू, अंधेरी, वर्सोवा आणि गोरेगाव अशा विविध विभागांत सेलीब्रिटींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यात काही सेलीब्रिटींनी मॉर्निंग वॉकला जातानाच आपला मतदानाचा हक्क बजावला. तर काहींनी दुपारचे ऊन सरल्यावर ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर उपस्थिती लावली. या वेळी या सेलीब्रिटींना पाहण्यासाठी चाहत्यांनीही मतदान केंद्रांवर काहीशी गर्दी केली. या सेलीब्रिटींनी स्वत: मतदान करीत राज्यातील मतदारांनाही मतदानाचे महत्त्व पटवून देत आपले कर्तव्य बजावण्याचे आवाहनही केले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील अमिताभ बच्चन, किंग खान, सोनाली बेंद्रे, वत्सल सेठ, ईशा देओल, हेमा मालिनी, रणबीर कपूर, भाग्यश्री, अभिषेक बच्चन, किरण राव, जया बच्चन, जावेद अख्तर, ओमप्रकाश मेहरा, किरण खेर, श्रीदेवी, गोल्डी बेहल आणि रेखा या दिग्गज सेलीब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला. तर आदेश बांदेकर, स्पृहा जोशी, स्वप्निल जोशी, सुबोध भावे, अनिकेत विश्वासराव, मिलिंद जोशी, पुष्कर श्रोत्री, मनवा नाईक, रितेश देशमुख या आघाडीच्या मराठी कलाकारांनीही मतदान केले. या सेलीब्रिटींनी मतदान केलेल्या ‘इंक फिंगर’चे सेल्फीजही सोशल नेटवर्किंग साइट्सवर टाकले. (प्रतिनिधी)