उपनगरात शबरी महोत्सवाची पर्वणी; दोन दिवसीय बौद्ध महोत्सवही रंगणार

By स्नेहा मोरे | Published: February 23, 2024 08:28 PM2024-02-23T20:28:02+5:302024-02-23T20:28:33+5:30

या महोत्सवाविषयी लोढा यांनी शुक्रवारी मंत्रालयात विधीमंडळ वार्ताहर कक्ष येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली.

Celebration of Shabri festival in suburbs; A two-day Buddhist festival will also take place | उपनगरात शबरी महोत्सवाची पर्वणी; दोन दिवसीय बौद्ध महोत्सवही रंगणार

उपनगरात शबरी महोत्सवाची पर्वणी; दोन दिवसीय बौद्ध महोत्सवही रंगणार

मुंबई : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'महासंस्कृती महोत्सव २०२४' अंतर्गत राज्यभर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने मुंबईकरांसाठी उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून मुंबई उपनगर जिल्ह्यात बौद्ध महोत्सव हा २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी आणि शबरी महोत्सव २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.

या महोत्सवाविषयी लोढा यांनी शुक्रवारी मंत्रालयात विधीमंडळ वार्ताहर कक्ष येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी, डॉ. भदंत राहुल बोधी, सामाजिक कार्यकर्ते शरद कांबळे, नितीन मोरे, अरविंद निकाळजे देखील यावेळी उपस्थित होते. आपल्या भूमीला भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा अमोघ वारसा आहे. त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांच्या संस्कृतीची देणगी आहे. प्रगतीच्या मार्गावर सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे असेल, तर आपला वारसा - संस्कृती जपणे अतिशय महत्वाचे ठरते. त्याच अनुषंगाने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. बौद्ध बांधवांनी आणि आदिवासी बांधवांनी आपल्या योगदानाने समाजाच्या प्रगतीसाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.

बौद्ध महोत्सवात भीम गीते स्पर्धा, परिसंवाद, संविधान रॅली
चेंबूर येथे सर्वोदय महाबुद्ध विहार, टिळक नगर, बुद्ध महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. हा कार्यक्रम भिक्खू संघ युनायटेड बुद्धिस्ट मिशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला आहे. शनिवार २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, डॉ. भदंत राहुल बोधी यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. त्यानंतर भीम गीते स्पर्धा, परिसंवाद, संविधान रॅली, धम्मपद भीम गीते यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होईल. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, या दिवशी कला अविष्कार, महिला मेळावा, धम्म सन्मान , शाहीर जलसा कार्यक्रम होतील.

शबरी महोत्सवात आदिवासी संस्कृतीचे पैलू उलगडणार -
२७ आणि २८ फेब्रुवारी रोजी गोरेगाव (पू.) येथील आरे कॉलनीमधील आदर्श नगर येथे शबरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात आदिवासी संस्कृतीचे विविध पैलू उलगडले जातील. त्यासाठी प्रदर्शने, वैदू संमेलन, जनजागृतीपर नृत्यांचे सादरीकरण, जनजाती पूजा मांडणी, महिला संमेलन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम वनवासी कल्याण आश्रमाच्या सहकार्याने आयोजित केला आहे.
 

Web Title: Celebration of Shabri festival in suburbs; A two-day Buddhist festival will also take place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.