सेलिब्रेशन हाऊसफुल्ल...
By Admin | Updated: December 28, 2014 23:18 IST2014-12-28T23:18:57+5:302014-12-28T23:18:57+5:30
थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे हॉटेल, रिसॉर्ट, लॉजिंग, कॉटेजेस हाऊसफुल झाली आहेत.

सेलिब्रेशन हाऊसफुल्ल...
आविष्कार देसाई, अलिबाग
थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे हॉटेल, रिसॉर्ट, लॉजिंग, कॉटेजेस हाऊसफुल झाली आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांना पसंती देण्याचे फॅड अलीकडेच फोफावले आहे. याठिकाणी पार्ट्या चांगल्याच रंगणार असून रिसॉर्टमधील पब आणि डिस्को थेकमध्ये पहाटे उशिरापर्यंत डीजेच्या दणदणाटाची धूम राहणार.
जिल्ह्यातील अलिबाग, नागाव, आक्षी, किहीम, मांडवा, मुरुड, काशीद, श्रीवर्धन, दिवेआगर अशा समुद्र किनाऱ्यावरील हॉट डेस्टीनेशनला मुंबई-पुण्यातील पर्यटकांची पसंती आहे, तसेच माथेरानमध्येही पर्यटक मोठया संख्येने येणार आहेत, तर काही पर्यटक हे विविध फार्महाऊसवरच नववर्षाचे सेलिब्रेशन करणार आहेत. महिनाभर आधीच येथील हॉटेल, रिसॉर्ट, लॉजिंगचे बुकिंग केले असून पर्यटकांचे थवेच्या थवे दाखल होत आहे. त्यांनी आतापासूनच थर्टी फर्स्टच्या पार्ट्या एन्जॉय करायला सुरुवात केल्याचे चित्र आहे.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि फुल एन्जॉयमेंटसाठी विविध हॉटेल, रिसॉर्टच्या व्यवस्थापनांनी इन हाऊस डीजे पार्ट्यांचे प्लॅनिंग केले आहे. काही बड्या रिसॉर्टमधील पब आणि डिस्को थेकमध्ये पहाटे उशिरापर्यंत डीजेचा दणदणाट चालू राहील. विविध हॉटेल व्यावसायिकांनी मांसाहारी जेवणामध्ये व्हेरायटी आणण्याकरिता चांगल्या रेसिपींचा समावेश केल्यामुळे खवय्यांच्या जिभेचे चोचले त्यानिमित्याने पुरविण्यात येणार आहेत.
तळीरामांना आपले कोरडे झालेले घसे ओले करण्यासाठी विविध बारमालकांनी आपापल्या परमिट रुमची क्षमता एका दिवसाकरिता वाढविण्याची तयारी सुरु केली आहे. डिसेंबरअखेर व्यावसायिकांची चांगलीच चंगळ होणार असून यामाध्यमातून जिल्ह्यात करोडो रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे.