नवी मुंबईत महिला दिन उत्साहात साजरा
By Admin | Updated: March 9, 2015 01:15 IST2015-03-09T01:15:25+5:302015-03-09T01:15:25+5:30
शहरातील कर्तृत्ववान महिलांचा यथोचित सन्मान करून, नवी मुंबईत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला.

नवी मुंबईत महिला दिन उत्साहात साजरा
नवी मुंबई : शहरातील कर्तृत्ववान महिलांचा यथोचित सन्मान करून, नवी मुंबईत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला.
महिला मेळावा, ज्येष्ठ महिलांचा सत्कार, महिला सक्षमीकरण आणि जनजागृतीपर व्याख्याने, आरोग्य तपासणी शिबिरे, बचत गटांच्या उत्पादनाची प्रदर्शने, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गुणगौरव इत्यादी कार्यक्रमांची दिवसभर रेलचेल होती.
शिवसेना शाखा इंदिरानगर यांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात अभिनेत्री अलका कुबल यांनी उपस्थित राहून महिलांशी हितगुज केले. नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. वाशी सेक्टर ३१ येथील केरळा भवनसमोरील नाना-नानी पार्कमध्ये महिलांबरोबर विविध समस्यांविषयी चर्चा केली. महिलांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांनी सांगितले. नगरसेविका हेमांगी सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली सेक्टर ४ मध्ये विविध क्षेत्रातील महिलांना सन्मानित करण्यात आले. सीबीडी सेक्टर-२५ मधील एकता विहार येथे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. (प्रतिनिधी)