जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात
By Admin | Updated: January 27, 2015 22:56 IST2015-01-27T22:56:19+5:302015-01-27T22:56:19+5:30
देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्या महान नेत्यांना, स्वातंत्र्य सेनानींना अभिवादन करून रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबध्द

जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात
अलिबाग : देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्या महान नेत्यांना, स्वातंत्र्य सेनानींना अभिवादन करून रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबध्द राहू, असा विश्वास पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली जन-धन योजना रायगड जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. आतापर्यंत २ लाख २ हजार ६५३ खाती या योजनेअंतर्गत उघडण्यात आल्याचेही मेहता यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित जिल्ह्याच्या मुख्य शासकीय समारंभात राज्याचे गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी अलिबागचे आमदार सुभाष पाटील, जिल्हाधिकारी सुमंत भांगे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, जिल्हा न्यायाधीश एच.ए.पाटील व स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री मेहता म्हणाले, २ आॅक्टोबर २०१४ पासून सुरू झालेले स्वच्छ भारत मिशन ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात या अभियानाची सुरु वात होऊन जिल्ह्यातील ८२२ ग्रामपंचायतींपैकी ४७१ ग्रामपंचायतींना प्रतिष्ठेचा निर्मल ग्राम पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित ग्रामपंचायतींनी स्वच्छता अभियान गतिमान करुन जिल्हा निर्मल करण्यात योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्यात संसद ग्राम योजनेंतर्गत तीन गावांची निवड खासदारांनी केली आहे. यात केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी दिवेआगर, खासदार किरीट सोमय्या यांनी चिंचोटी तर खासदार श्रीरंग बारणे यांनी बांधपाडा-खोपटा ही गावे दत्तक घेतली आहे. ही तिन्ही गावे राज्यातच नव्हे तर देशपातळीवर आदर्शवत ठरतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात वाळीत कुप्रथेला सर्वांनी बाजूला टाकून जिल्ह्याला लागत असलेला हा कलंक दूर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. वळके-मुरुड येथील नारायण कमळ्या गायकर विद्यालयातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी अमित गजानन पवार याने डोहात बुडणाऱ्या तीन मुलींना वाचविल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. नेहरु युवा केंद्रातर्फे दिला जाणारा सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य जिल्हास्तरीय उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था, सानेगांव-रोहा या संस्थेला तर जास्त बी गोळा केल्याबद्दल प्रायव्हेट ज्युनिअर कॉलेज पेणला प्रथम बक्षीस देण्यात आले.