महामानवांची जयंती उत्साहात साजरी
By Admin | Updated: April 14, 2015 22:48 IST2015-04-14T22:48:14+5:302015-04-14T22:48:14+5:30
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

महामानवांची जयंती उत्साहात साजरी
वसई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने वसई विरार उपप्रदेशात निरनिराळ्या ठिकाणी सामाजिक संस्थांनी उपक्रम राबवले. तर ग्रामीण भागामध्ये अनेक उत्साही कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढली.
दरवर्षाप्रमाणे यंदाही बाबासाहेबांची जयंती जल्लोषात साजरी झाली. नालासोपारा येथील बौद्धस्तूपावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिकेनेही बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम राबवले. प्रभाग समिती ‘इ’ चे सभापती नितिन राऊत यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला व अभिवादन केले. तर काही सामाजिक संस्थांनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम राबवले.
यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी बौद्धस्तूपाचे सुशोभीकरण तसेच देखभालीच्या खर्चासाठी राज्यशासनाने महानगरपालिकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध
करावा अशी मागणी केली.
(प्रतिनिधी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तलासरीत आज उत्साहात साजरी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी तलासरी गावातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली. यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरांचे अनुयायी उपस्थित होते. नोकरी धंद्यानिमित्ताने स्थायिक झालेले तलासरीतील अनुयायी मोठ्या उत्साहाने डॉ. आंबेडकर जयंती साजरी करतात. त्याच प्रमाणे तलासरीतील शासकीय कार्यालयामध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला अधिकाऱ्यांनी पुष्पहार घातले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त आज पालघर शहरामध्ये विविध भागातील आंबेडकर अनुयायानी ढोल, ताशे, लेझीमच्या गजरात शोभायात्रा काढली होती. पालघरच्या आंबेडकर नगर, भीमाईनगर, टेंभोड्याचे आंबेडकर नगर इ. भागातील हजारो आंबेडकरी अनुयायानी आपल्या परंपरागत पांढऱ्या पेहरावात हातात लेझीम व झेंडे घेऊन शोभायात्रा काढल्या होत्या. या यात्रा पालघरच्या हुतात्मा स्तंभाजवळ आल्यानंतर हुतात्म्यांना वंदन करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, सभापती रविंद्र पागधरे, उपनगराध्यक्ष उत्तम घरत, जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी आज युवा पंचशील मित्र परिवाराच्या वतीने पुणे, मावळ येथील ७५ वादकांचे ढोल पथक व राष्ट्रपतीने गौरविलेल्या इंदापुर येथील ७५ वादकांचे हलगी व लेझीम पथकाच्या कवायती होणार आहेत.