सीसीटीव्ही फुटेज ठरणार निर्णायक
By Admin | Updated: January 17, 2015 01:27 IST2015-01-17T01:27:28+5:302015-01-17T01:27:28+5:30
वाशी येथील दरोड्याच्या घटनेच्या कसून तपासावर वाशी पोलिसांनी जोर दिला आहे. सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्याकडून याबाबतची चौकशी केली जात आहे

सीसीटीव्ही फुटेज ठरणार निर्णायक
नवी मुंबई : वाशी येथील दरोड्याच्या घटनेच्या कसून तपासावर वाशी पोलिसांनी जोर दिला आहे. सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्याकडून याबाबतची चौकशी केली जात आहे. त्याकरिता तपास पथके देखील तयार करण्यात आली आहेत.
वाशी सेक्टर १६ येथील चित्तोडगड सोसायटीत वृध्द दांपत्यावर हल्ल्याची घटना घडली. दरोड्याच्या उद्देशाने १० जानेवारीला पहाटे घडलेल्या या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रमनलाल सेठ (७४) यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे. दरोडेखोरांनी तोंडाला मास्क बांधून सोसायटीत प्रवेश केला होता. त्यामुळे सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे असूनही गुन्हेगारांची चेहराओळख पटलेली नाही. त्याकरिता विशेष तपास पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच सराईत गुन्हेगारांचाही शोध घेवून चौकशी केली जात असल्याचेही पाडवी यांनी सांगितले. सीसीटीव्हीचे हे चित्रीकरण नवी मुंबई लगतच्या शहर पोलिसांकडे देखील तपासाकरिता पाठवण्यात आले आहेत. त्याद्वारे दरोडेखोरांचा शोध घेण्याचा पुरेपूर प्रयत्न वाशी पोलिसांनी चालवला आहे. घरामध्ये घुसलेल्या चारही दरोडेखोरांनी क्रूरतेने रमनलाल सेठ व लीला सेठ या दांपत्यावर हल्ला केला. त्यात सतत रक्तस्त्राव झाल्याने रमनलाल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सेठ यांच्या घरात घुसलेले सराईत गुन्हेगार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)