दलालांवर आता सीसीटीव्हीची नजर!

By Admin | Updated: July 5, 2014 04:04 IST2014-07-05T04:04:47+5:302014-07-05T04:04:47+5:30

मुलुंड तहसील कार्यालयातून विविध दाखले मिळविण्यासाठी होत असलेल्या दलालीचा ‘लोकमत’ने पर्दाफाश केल्यानंतर प्रशासनाचे धाबे दणाणले आहे

CCTV eye on brokers now! | दलालांवर आता सीसीटीव्हीची नजर!

दलालांवर आता सीसीटीव्हीची नजर!

मनीषा म्हात्रे, मुंबई
मुलुंड तहसील कार्यालयातून विविध दाखले मिळविण्यासाठी होत असलेल्या दलालीचा ‘लोकमत’ने पर्दाफाश केल्यानंतर प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. येथील दलालांवर वॉच ठेवण्यासह दाखले मिळविण्याबाबत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी आता येथे सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मुलुंड येथील तहसील कार्यालयात नॉन क्रिमिलेअर आणि डोमिसाइल सर्टिफिकेटसाठी विद्यार्थी वर्गाची मोठ्या प्रमाणावर रांग लागली आहे. मात्र इथला दलालवर्ग त्यांना हाताशी धरून त्यांची फसवणूक करीत होता. हे कमी नाही म्हणून की काय, इथल्या पोलीस कर्मचारी वर्गानेही दलालीचे काम सुरू केले होते. आणि हेच बिंग ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनद्वारे फोडले होते. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या वृत्ताची प्रशासनाने दखल घेतली असून, येथील दलाल वर्गानेही तहसील कार्यालयातून पाय काढला आहे. विशेष म्हणजे आता तर येथील पोलीस बंदोबस्तात आणखी वाढ करण्यात आली आहे. शिवाय साध्या वेषातील पोलिसांनाही येथे तैनात करण्यात आले आहे. हे साध्या गणवेशातील पोलीस विद्यार्थ्यांमध्ये पालक म्हणून वावरणार आहेत, अशी माहिती निवासी नायब तहसीलदार सुनील जाधव यांनी दिली.
‘लोकमत’च्या दणक्यानंतर येथील कामालाही गती मिळाली आहे. आतापर्यंत विविध दाखल्यांसाठी एप्रिल महिन्यात ४,३९६ अर्ज प्राप्त झाले होते, मे महिन्यात ६,०१५ अर्ज प्राप्त झाले होते. दोन्ही महिन्यांच्या एकूण अर्जांपैकी ५०० ते ६०० अर्ज कागदोपत्री त्रुटींमुळे वगळण्यात आल्याने उर्वरित सर्व दाखले वितरित केले होते. विशेषत: महाविद्यालयीन प्रवेशाचा अंतिम टप्पा असल्याने जून महिन्यात ९,१४६ अर्ज विविध दाखल्यांसाठी जमा झाले होते. त्यापैकी जूनअखेर ७,८३८ दाखले वितरित केले आणि १,२५३ हे टपाल योजनेअंतर्गत पोस्टाने पाठविले आहेत, अशी माहिती सुनील जाधव यांनी दिली. शिवाय २,३३८ दाखले प्रिंटिंगसाठी पाठविण्यात आले असून, तेही आठवडाभरात देणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

Web Title: CCTV eye on brokers now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.