अपंगांच्या डब्यात लागणार सीसीटीव्ही
By Admin | Updated: January 10, 2015 02:06 IST2015-01-10T02:06:58+5:302015-01-10T02:06:58+5:30
अपंग प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या डब्यात शिरकाव करणाऱ्या अन्य प्रवाशांना रोखण्यासाठी अपंगांच्या डब्यात सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

अपंगांच्या डब्यात लागणार सीसीटीव्ही
मुंबई : अपंग प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या डब्यात शिरकाव करणाऱ्या अन्य प्रवाशांना रोखण्यासाठी अपंगांच्या डब्यात सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. शुक्रवारी दादर येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रवाशांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रवासी संघटनांशी भेटीगाठी घेतल्या. त्या वेळी एका अपंग प्रवासी संघटनेकडून घेतलेल्या भेटीत त्यांनी ही माहिती दिल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. या वेळी त्यांच्यासोबत सुनील कुमार सूदही उपस्थित होते.
अपंगांच्या डब्यातून प्रवास करताना अपंग प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अन्य प्रवाशांचा शिरकाव होत असताना त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न अपंग प्रवाशांकडून केला जातो. यात काही वेळेला अपंग प्रवाशांना धक्काबुक्की केली जाते. त्यांच्या डब्यात शिरकाव करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे पोलिसांकडूनही रोखले जाते. तर अपंगांच्या डब्यातून प्रवास करू नये अशी उद्घोषणाही रेल्वेकडून केली जाते. मात्र त्याकडे दुर्लक्षच केले जाते. या सर्व बाबी पाहता अपंगांच्या डब्यात सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय झाला आहे. याची अंमलबजावणीही केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. अनेक प्रवासी संघटनांनी आपल्या मागण्या सादर करण्यासाठी हजेरी लावलेली असतानाच अंध प्रवाशांच्या संघटनेकडून्ही उपस्थिती लावण्यात आली होती. ब्लार्इंड पर्सन असोसिएशनचे अध्यक्ष सुहास कर्णिक यांनी या वेळी त्यांच्या मागण्यांवर रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती दिली.प्रतिनिधी)