Join us  

CcoronaVirus News: चिंतेत भर! आज मुंबईत आढळले ८९७ नवे रुग्ण; ९३ चाळी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 1:02 AM

९३ चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन म्हणून घोषित

मुंबई : मुंबईत गेल्या अकरा महिन्यांत केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. मुंबईत ३०० ते ४०० रुग्ण आढळून येत होते. मात्र एक महिन्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. १४ फेब्रुवारीला ६४५, १५ फेब्रुवारीला ४९३, १६ फेब्रुवारीला ४६१, १७ फेब्रुवारीला ७२१, १८ फेब्रुवारीला ७३६, १९ फेब्रुवारीला ८२३ तर शनिवारी ८९७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण संख्या वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ३ लाख १८ हजार २०७ वर पोहचला आहे. शनिवारी तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ११ हजार ४३८ वर पोहचला आहे. ४७१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या २ लाख ९९ हजार ६ वर पोहचली आहे. मुंबईत सध्या ६ हजार ९०० सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी ३७१ दिवस इतका आहे.

मुंबईत कोरोना रुग्ण आढळलेल्या ९३ चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर, १३०५ इमारतीत रुग्ण आढळल्याने त्या सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत ३१ लाख १७ हजार २९४ चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मुंबईत बोरिवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळक नगर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. येथे कोरोना  प्रतिबंधात्मक नियम पाळावेत म्हणून सोसायट्यांना पालिकेने नोटीस बजावल्या आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई