Join us  

CBSE Paper Leak 2018 : विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेला बसवू नका, राज ठाकरेंचं पालकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 1:13 PM

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेला बसवू नका, असं आवाहन राज ठाकरे यांनी पालकांना केले आहे.

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(सीबीएसई)चे पेपर फुटल्यानं पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये फारच गोंधळ उडाला आहे. इयत्ता दहावीचा गणित आणि इयत्ता बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटल्यानं या विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली.  यावेळी सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेला बसवू नका, असं आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी पालकांना केले. शिवाय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना देशभरातील विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या पाठीशी ठाम उभी राहील, असेही आश्वासन राज ठाकरे यांनी दिलं आहे. 

राज ठाकरे यांनी पालकांना नेमकं काय केलंय आवाहन?

सीबीएसईच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका परीक्षे आधीच फुटल्या, हा मुळात सरकारचा हलगर्जीपणा आहे. पण स्वतःची चूक सुधारायची किंवा मान्य करायची सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावत आहेत? सरकारला जर प्रश्नपत्रिकांची गोपनीयता नीट राखता येत नसेल तर त्यात विद्यार्थ्यांचा काय दोष, त्यांनी का पुन्हा त्या विषयांच्या परीक्षेला बसायचं? माझं देशभरातील पालकांना आवाहन आहे की कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलांना फेर-परीक्षेला बसवू नका. तुम्ही झुकताय हे जर सरकारच्या लक्षात आलं तर ते तुम्हाला अजून वाकवायचा प्रयत्न करेल. तुम्ही निर्णयावर ठाम रहा, सरकारला काय निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ दे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेना देशभरातील विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या पाठीशी ठाम उभी आहे, उभी राहील.  - राज ठाकरे

काय आहे सीबीएसई पेपरफुटी प्रकरण? 

दहावी, बारावीच्या पेपरफुटीमुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दोन विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय जाहीर केला. दहावी, बारावीच्या फुटलेल्या गणित आणि अर्थशास्त्रविषयाची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच सीबीएसईच्या वेबसाईटवर जाहीर केले जाणार आहे. दहावीचा गणिताचा पेपर २८ मार्चला तर बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर २७ मार्चला झाला. या दोन्ही विषयांचे पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आले. 

 

टॅग्स :सीबीएसई पेपरफुटी प्रकरणराज ठाकरे