छोटा राजनवर नोंदविलेल्या ७१ प्रकरणांपैकी १६ प्रकरणांत सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:31 IST2021-02-05T04:31:31+5:302021-02-05T04:31:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : छोटा राजन याच्यावर नोंदविण्यात आलेल्या ७१ केसेसपैकी १६ केसेसमध्ये सीबीआयने विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट ...

छोटा राजनवर नोंदविलेल्या ७१ प्रकरणांपैकी १६ प्रकरणांत सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : छोटा राजन याच्यावर नोंदविण्यात आलेल्या ७१ केसेसपैकी १६ केसेसमध्ये सीबीआयने विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. या १६ केसेसपैकी किमान निम्म्या प्रकरणांत विशेष न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे.
१९९९ च्या खंडणी व हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी छोटा राजनवर नोंदविलेल्या गुन्ह्याप्रकरणी सीबीआयने न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. दोन आठवड्यांपूर्वी न्यायालयाने राजनविरोधात पुरावे नसल्याचे म्हणत हा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला.
जोगेश्वरी येथील एका गॅरेज मालकावर १२ ऑगस्ट १९९९ रोजी दुपारी गोळीबार करण्यात आला. त्याच्यावर गोळीबार करणाऱ्या अज्ञात व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी मकोका अंतर्गत पाच जणांवर गुन्हा नोंदविला. त्यात छोटा राजनचाही समावेश होता.
डिसेंबर २०१५ मध्ये छोटा राजनला अटक केल्यानंतर त्याचा ताबा सीबीआयकडे देण्यात आला. सर्व प्रकरणांचा तपास केल्यावर काही प्रकरणांत सीबीआयला राजनविरोधात पुरावे सापडले नाहीत. त्या प्रकरणांत सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला.
छोटा राजन आतापर्यंत ज्येष्ठ पत्रकार डे यांच्या हत्येप्रकरणी व व्यावसायिक बी. आर. शेट्टी हत्येप्रकरणात दोषी आढळला आहे. डे हत्येप्रकरणी न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सध्या तो तिहार कारागृहात आहे.