Join us  

ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा सीबीआयने नोंदविला जबाब

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 6:21 AM

हप्ता वसुली, पाेलीस बदली रॅकेट प्रकरणाच्या अनुषंगाने तपास

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी वसुलीच्या आरोपप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेच्या (सीबीआय) पथकाने ज्येष्ठ आयपीएस रश्मी शुक्ला यांचा हैदराबाद येथे जाऊन जबाब नोंदविला. महाराष्ट्र गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना त्यांनी पोलीस बदल्यांच्या रॅकेटबद्दल त्यांनी सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेण्यात आल्याचे समजते.

सिंग यांच्या आरोपांमध्ये शुक्ला यांनी सादर केलेल्या अहवालाचा संदर्भ होता. त्या अनुषंगाने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या हैदराबाद  कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असलेल्या शुक्ला यांचा दोन दिवसांपूर्वी जबाब नोंदविल्याचे सूत्रांनी सांगितले. गुन्हा दाखल करण्यापूर्वी सीबीआयने सिंंग, अनिल देशमुख यांचेही जबाब नोंदवले. या गुन्ह्यात शुक्ला यांना सीबीआय साक्षीदार म्हणून सादर करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.

 सायबर पोलीसही नाेंदवणार जबाब

अतिगोपनीय अहवाल फोडल्याप्रकरणी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी शुक्ला यांना चौकशीस हजर राहण्यासाठी सोमवारी समन्स बजाविले होते; परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईत येण्यास असमर्थता दर्शवित त्यांनी एफआयआरची कॉपी व चौकशीची प्रश्नावली मागितली; मात्र सायबर पाेलिसांना त्यांना मुंबईत बोलावून त्यांची चौकशी करायची असल्याचे समजते. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर त्यांना हजर राहण्यासाठी पुन्हा समन्स पाठविले जाण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली.

असे आहे प्रकरण :

शुक्ला एसआयडी प्रमुख असताना गेल्यावर्षी २५ ऑगस्टला पोलीस अधिकारी बदली रॅकेटबद्दल त्यांनी काही व्यक्तींचे फोन टॅप करून अहवाल तयार केला. महाराष्ट्र सरकारने ताे फेटाळला. अधिकाराचा गैरवापर, नियमबाह्य कृत्य केल्याचा ठपका ठेवला. त्यांनी माफी मागितल्यानंतर कारवाई करण्याचे टाळले; तोच गोपनीय अहवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या २३ मार्चला उघड करून राज्य सरकारवर आरोप केले.

टॅग्स :रश्मी शुक्लापोलिस