आयआरबी कार्यालयावर सीबीआयचे छापे
By Admin | Updated: January 6, 2015 02:04 IST2015-01-06T02:04:33+5:302015-01-06T02:04:33+5:30
सीबीआयने सोमवारी आयआरबीच्या पुणे, लोणावळा व मुंबई येथील कार्यालय आणि निवासस्थान असे सुमारे २१ ठिकाणी छापे टाकले.

आयआरबी कार्यालयावर सीबीआयचे छापे
मुंबई/पिंपरी : सीबीआयने सोमवारी आयआरबीच्या पुणे, लोणावळा व मुंबई येथील कार्यालय आणि निवासस्थान असे सुमारे २१ ठिकाणी छापे टाकले. पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वरील लोणावळा येथील जमीन बळकावल्याप्रकरणी फेरतपास करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिले. त्यानुसार हे छापे टाकण्यात आले.
सीबीआयने या कारवाईबाबत माहिती देण्यास नकार दिला. हा छापा नसून केवळ तपासणी असल्याचे सीबीआयचे प्रवक्ते कंचन प्रसाद यांनी सांगितले. जमीन बळकावल्याप्रकरणी एका प्रकरणात आयआरबीचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर, संचालक दीपक गाडगीळ, ज्योती कुलकर्णी, नवीन राय, सिराज बागवान, अनिल वडगमा, दत्तात्रय मांडेकर, नवाज खान, नासीर खान, अश्विनी क्षीरसागर, सीताबाई तावरे, लक्ष्मीबाई वरघडे, रामचंद्र बालगुडे, बापूदेव पारखी, रघुनाथ पारखी, बबनदेव पारखी आणि छबुदेव पारखी यांच्या कार्यालय आणि घरात तपासणी केली जात आहे. (प्रतिनिधी)
तळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वरील मावळ तालुक्यातील काही जमिनी आयआरबीने बळकावल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर १३ जानेवारी २०१० रोजी त्यांची हत्या झाली. तथापि, या तपासणीचा शेट्टी यांच्या हत्याप्रकरणाशी संबंध असल्याचा प्रसाद यांनी इन्कार केला. तसेच शेट्टी हत्याप्रकरणी सीबीआयने कनिष्ठ न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.